

देवाळे: देवाळे (तालुका करवीर) येथे शुक्रवारी दोन गवे दिसले होते. यातील एक गवा कोल्हापूर राधानगरी मार्गावरून कांडगावच्या ओढ्याकडून गावातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहिरीकडील परिसरात गेला. काहीवेळाने तो गवा नागरी वस्तीतही आला. यामुळे देवाळे गावामध्ये काहीवेळ पळापळ झाली. गवा गावात आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिन्यापूर्वी परिते येते एका शेतकऱ्याला गव्याने हल्ला करुन गंभीर जखमी केली होते. यामुळे नागरिक घाबरले होते. तसेच सोशल मीडिया वरती ‘गवे आले आहेत, गव्यापासून दूर राहा’ असे मेसेज पाठवून शेतकरी व ग्रामस्थांना सतर्क करण्यात आले. यानंतर नागरी भागात आलेला गवा डोंगराकडील शेत शिवारात गेला. दरम्यान गवा गावात आल्याची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल एम. डी. कुंभार यांनी आपल्या पथकासह परिसरात पाहणी केली असता गवा आढळून आला नाही. तो शेतात अन्यत्र असण्याची शक्यता आहे त्यामुळे दक्षता घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
दरम्यान दुसरा गवा भोगावती नदीच्या दिशेने गेला. पाणीपुरवठा संस्थेचे कर्मचाऱ्याला तो नदीकडे जात असल्याचा आढळून आला. पोलीस पाटील नंदकुमार सुतार यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली. गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.