Kolhapur gas cylinder distribution | कोल्हापुरात पोलिस बंदोबस्तात ग्राहकांना गॅस सिलिंडरचे वितरण

कोल्हापूर : संभाजीनगर येथे पोलिस बंदोबस्तात गॅस सिलिंडरचे वितरण करण्यात आले.
कोल्हापूर : संभाजीनगर येथे पोलिस बंदोबस्तात गॅस सिलिंडरचे वितरण करण्यात आले. (छाया : पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : अमेरिका-इस्रालय आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच एजन्सीजसमोर तिसर्‍या दिवशीही रांगा लागल्या आहेत. संभाजीनगर येथे गॅस वितरकाच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी गुरुवारी सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. नागरिकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पोलिस बंदोबस्तात गॅस सिलिंडर वितरण करण्यात आले.

दरम्यान, संभाजीनगर, मंगळवार पेठेसह शहर, जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गॅस वितरक आणि नागरिकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी उडत आहेत. संभाजीनगरमध्ये संताप अनावर झाल्याने नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली. गेले दोन दिवस शहरासह जिल्ह्यात गॅसटंचाई जाणवत आहे. तर, टंचाई नसून मुबलक साठा असल्याचे जिल्हा प्रशासन सांगत आहे. मात्र, टंचाईच्या धास्तीने नागरिक हवालदिल झाले आहेत. परिणामी, सर्वच गॅस वितरण कार्यालयांसमोर नागरिकांची झुंबड उडत आहे. एकाचवेळी शेकडो नागरिकांची रांग लागत असल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रकार घडत आहे. गुरुवारी तिसर्‍या दिवशीही गॅस एजन्सीजसमोर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.

सकाळपासूनच रांगा

संभाजीनगर येथील गॅस एजन्सीबाबत नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आहेत. बुधवारी नागरिक आणि गॅस वितरण कर्मचार्‍यांमध्ये चांगलीच हातघाई झाली. एकमेकांची गळपट धरण्याचा प्रकार घडला आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून या एजन्सीसमोर गॅस सिलिंडरसाठी नागरिकांनी रांग लावली होती. मात्र, सिलिंडर देण्यात घोळ होत असल्याचा आरोप करत संतप्त नागरिक थेट रस्त्यावर उतरले आणि रास्ता रोको आंदोलन सुरू केले. सकाळीच अचानक झालेल्या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने सुमारे दीड तास रस्ता रोखण्यात आला. त्यामुळे वाहनधारक आणि नागरिक यांच्यातही खडाजंगीचे प्रकार घडले. दरम्यान, रस्ता मोठा असल्याने एका बाजूने दुचाकीस्वारांनी मार्ग काढला.

पोलिसांनी साधला समन्वय

संतप्त नागरिकांचा रुद्रावतार पाहून अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी गॅस वितरकाशी चर्चा करून गॅस वितरण सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दीड तासानंतर रास्ता रोको आंदोलन समाप्त करण्यात आले. आक्रमक नागरिकांची समजूत काढून गॅस वितरण सुरळीत करण्यात आले; मात्र पोलिस बंदोबस्तात गॅस वितरण सुरू करण्याची वेळ आली.

कर्मचारी-ग्राहकांमध्ये बाचाबाची

मंगळवार पेठेतील गॅस एजन्सीसमोरही सकाळपासूनच मोठी रांग लागली होती. गॅस वितरण कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. अखेर एजन्सीचे मालक येताच मालक आणि ग्राहकांमध्येही शाब्दिक चकमक उडाली. काही उपस्थित नागरिकांनी समजूत काढल्याने वातावरण निवळले. त्यानंतर वितरण सुरळीत करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news