

कोल्हापूर : पारंपरिक वाद्यांसह साऊंड सिस्टीमच्या दणदणाटात आणि मिरवणूक मार्गावर उसळलेल्या जनसागराच्या साक्षीने लाडक्या बाप्पांना शनिवारी निरोप देण्यात आला. अमाप उत्साह आणि चैतन्यदायी वातावरणात गणेश विसर्जन मरवणूक 24 तास रंगली. अलोट गर्दीने फुललेला मिरवणूक मार्ग सायंकाळनंतर रोषणाईने उजळून गेला. गर्दीमुळे अनेक ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. त्यात काहीजण जखमीही झाले. गणेशमूर्ती पुढे नेण्यावरून झालेल्या वादावादीमुळे चारवेळा पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
मध्यरात्री बारा वाजताच सर्व वाद्ये, साऊंड सिस्टीम आणि लाईटस् बंद झाली. यानंतर पोलिसांनी नागरिकांना अक्षरश: हाकलून लावले. हातगाड्याही बंद करण्यास भाग पाडले. यामुळे मिरवणूक मार्गावरील नागरिकांची गर्दी रात्री दोननंतर पूर्णपणे ओसरली. रविवारी सकाळी नऊ वाजता इराणी खणीवर अखेरच्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. यानंतर मिरवणुकीची सांगता झाली.
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी अनेक मंडळांनी शुक्रवारी मध्यरात्रीच मूर्ती मार्गावर आणून ठेवल्या होत्या. कार्यकर्त्यांसह परिसरातील महिलांकडून आरती, औक्षण करून, फुलांचा वर्षाव करत, फुलांच्या पायघड्यांवरून गणेशमूर्ती मंडपाबाहेर आणल्या होत्या. यानंतर सजवलेल्या वाहनातून मूर्ती मुख्य मिरवणुकीत सहभागी होत होत्या. मिरजकर तिकटी येथे सकाळी सव्वानऊ वाजता मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेशमूर्तीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. ढोल-ताशा, झांजपथक, लेझीम आदी पारंपरिक वाद्यांचा गजर करत, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या पुरुष व महिला कार्यकर्त्यांच्या अपूर्व उत्साहात मिरवणूक पुढे सरकत होती. करवीर निवासिनी श्री अंबाबाई, तिरुपती बालाजी, जगद्गुरू संत तुकाराम आणि युगपुरुष छत्रपती शिवराय यांची भेट, श्रीकृष्ण, संत ज्ञानेश्वर, बाळूमामा, खंडोबा, हत्तीवरील अंबारीत विराजमान झालेला लोकराजा राजर्षी शाहू आदी देखाव्यांसह प्रशासनालाही अंतर्मुख करायला लावणारे सामाजिक समस्यांवरील भाष्य करणारे फलक मिरवणुकीचे आकर्षण ठरत होते.
सकाळी दहा-साडेदहानंतर मंडळे वेगाने पुढे सरकत होती. दुपारी मंडळांचा मुख्य विसर्जन मार्गावरील वेग काहीसा संथ झाला. दुपारी तीननंतर गर्दी वाढत गेली. सायंकाळी सहानंतर तर मिरवणूक मार्गावर अलोट गर्दी झाली होती. मुख्य विसर्जन मार्गावर मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार चौक आणि पापाची तिकटी येथून प्रवेश दिला जात होता. या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेडिंग केले होते. यामुळे अनेक मंडळांना सकाळी लवकर येऊनही मुख्य मिरवणुकीत येण्यासाठी सायंकाळपर्यंत वाट पाहावी लागली. सायंकाळ होताच विविध मंडळांच्या लाईट इफेक्टस्नी मिरवणूक मार्ग उजळून गेला. रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास मिरवणुकीतील अखेरचे मंडळ असलेल्या विक्रमनगर तिसरी गल्ली येथील क्रांतिवीर भगतसिंग फ्रेंड सर्कलच्या मंडळांची पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या हस्ते आरती झाली. यानंतर इराणी खणीवर सकाळी 9 वाजता मिरवणुकीतील अखेरच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.