

जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील हडको वसाहत श्रीरामनगरमधील गायरान जमिनीवर गुरुवारी रात्री बांधलेले गणपती मंदिर काही अज्ञातांनी मध्यरात्रीच्या दरम्यान पाडल्याची घटना घडली. त्यामुळे शुक्रवार पहाटेपासून याठिकाणी मोठ्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिरोळ पोलिस व नांदणी ग्रामपंचायतीने हा वाद शांत करून मंदिराबाबतचे निवेदन ग्रामपंचायतीला द्यावे. वरिष्ठांना कळवून पुढील निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. नांदणी हडको वसाहत श्रीरामनगरमध्ये गायरान गट क्र. 122 मध्ये अज्ञातांनी गुरुवारी रात्री एकत्र येऊन एक लहान गणपती मंदिर बांधले होते. परंतु, काही समाजकंठकांनी गुरुवारी मध्यरात्री हे गणपती मंदिर पाडून साहित्याची नासधूस करून मंदिरातील गणपती मूर्ती व झेंडा गायब केला होता.
शुक्रवार पहाटे हे समजताच येथील नागरिकांना घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली. तसेच, शिरोळ पोलिस ठाण्याचे अधिकारी व गावकामगार पोलिसपाटील यांनी घटनास्थळावर धाव घेऊन वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, नागरिक व हिंदुत्ववादी संघटनांनी जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही, असा पवित्रा घेतल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला. अखेर ती जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची असून, मंदिर पुन्हा उभारण्याबाबतचे निवेदन ग्रामपंचायतीकडे द्यावे. वरिष्ठांना कळवून पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक यांनी दिले आहे.