

कोल्हापूर : शुगर मिल कॉर्नर- शिये फाटा रोडवर गांजा तस्करी करणार्या राजारामपुरी येथील सचिन शामराव पाटील (वय 30, रा. शाहूनगर, कोल्हापूर) यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केले. 1 लाख 37 हजार रुपये किमतीचा 3 किलो 100 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला. इचलकरंजी येथून गांजाची तस्करी केल्याचे संशयिताने कबुली दिली.
संशयित पोलिस रेकॉर्डवरील सराईत असून गांजा तस्करीप्रकरणी आठ महिन्यांपूर्वी त्याच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, असे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. संशयित कसबा बावडा परिसरात शुगर मिल कॉर्नर-शिये फाटादरम्यान मंगल कार्यालय परिसरात गांजा तस्करी करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.
पथकाने या मार्गावर सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. झडतीत त्याच्याकडे 3 किलो 100 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे, अशोक पोवार, सचिन पाटील आदींनी कारवाई केल्याचे सांगण्यात आले. इचलकरंजी येथून गांजा खरेदी केल्याची त्याने माहिती दिली. पोलिसांचे पथक इचलकरंजीला रवाना झाले आहे.