

कोल्हापूर : मद्यधुंद अवस्थेत पाच ते सहा तरुणांच्या टोळक्याने रामानंदनगर आणि जरगनगर येथे गुरुवारी मध्यरात्री प्रचंड दहशत माजविली. डॉ. व्ही. व्ही. देशपांडे यांच्या उषा हॉस्पिटल व संतोष अकोळकर यांच्या घरावर दगडफेक करून नुकसान केले. संशयितांनी पाच मोटारींसह दुचाकीचीही तोडफोड केली. टोळक्याने केलेल्या दगडफेकीत डॉ. देशपांडे व अकोळकर जखमी झाले आहेत. टोळक्याच्या कृत्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
करवीर पोलिस ठाण्यात संशयित वृषभ साळोखेसह अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांची नावे निष्पन्न झाली असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले. करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांनीही दुपारी घटनास्थळाची पाहणी केली. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, रात्री 12 वाजता डॉ. देशपांडे दवाखाना बंद करून जरगनगर येथील घराकडे जात असताना दुचाकीवरून दोन तरुण आले. दादा आजारी आहे, असे ते बरळत होते. डॉक्टरांनी कोण दादा, पेशंट कोठे आहे, अशी विचारणा केली; मात्र तरुण काही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे डॉक्टर घराच्या दिशेने जाऊ लागले. संबंधित तरुणांनी डॉक्टरांचा दुचाकीवरून पाठलाग केला. डॉक्टर घराजवळ पोहोचताच तरूणानी त्यांच्या दिशेने अचानक दगडफेक केली. मोटारही फोडली. पुन्हा हॉस्पिटलवर दगडफेक केली. डॉ. देशपांडे यांनी पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधताच काही काळात पोलिस दाखल झाले.
थोड्यावेळाने पोलिसांनी पाठ फिरविताच मध्यरात्री दीड वाजता तीन दुचाकीवरून आणखी काही तरुण डॉ. देशपांडे यांच्या उषा हॉस्पिटलसमोर आले. त्यांनी हॉस्पिटलवर दगडासह विटांचा मारा केला. हॉस्पिटलच्या बोर्डासह खिडकीच्या काचाही फोडल्या. आरडाओरड करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांना उद्देशून शिवीगाळ केली.
संशयिताच्या आवाजाने हॉस्पिटलसमोर राहणारे संतोष अकोळकर व त्यांचे कुटुंबीय जागे झाले. त्यांनी तरुणांना उद्देशून दगडफेक का करत आहात, अशी विचारणा केली. तरुणांनी अकोळकर यांच्या लोखंडी प्रवेशद्वारावर चढून घराच्या दिशेने दगडफेक सुरू केली. अकोळकर यांच्या मोटारीसह समोर पार्क केलेल्या मोटारीचेही नुकसान केले.
टोळक्याने केलेल्या दगडफेकीत अकोळकर जखमी झाले. या घटनेनंतर रामानंदनगर येथील नागरिकांची घटनास्थळी गर्दी होताच टोळक्याने अंधारातून पलायन केले. डॉ. देशपांडे, अकोळकरसह रामानंदनगर येथील संतप्त नागरिकांनी मध्यरात्री करवीर पोलिस ठाण्यांकडे धाव घेतली. संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळक्याच्या कृत्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.