

कोल्हापूर : चौकात दंगल सुरू असल्याचे सांगत मौल्यवान वस्तू काढून ठेवण्याचा सल्ला देत हातचलाखीने क्षणार्धात दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या कर्नाटकातील टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणने बुधवारी जेरबंद केले. टोळीचा सूत्रधार राकेश यंकाप्पा गोंधळी (वय 34), दुर्गव्वा गंगाप्पा कुंडले (45), मंजुळा राकेश गोंधळी (28, रा. तहसीलदार प्लॉट, निपाणी, बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. संशयिताकडून दागिने लुटमारीचे अनेक गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे.
चोरट्याकडून सोन्याची कर्णफुले, बुगड्या, मंनी मंगळसूत्र, सोन्याची फुले असा 2 लाख 66 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कोल्हापूर, सांगलीसह सीमाभागात संशयितांनी अनेक गुन्हे केले असावेत, असा संशय पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी व्यक्त केला. महिलाकडून लुटलेले दागिने विक्रीसाठी संशयित महामार्गावर उजळाईवाडी परिसरात येणार असल्याचा सुगावा लागला. सहायक निरीक्षक सागर वाघ, शेष मोरे, समीर कांबळे, राजू कोरे यांच्या पथकाने सापळा रचून टोळीला ताब्यात घेतले. चौकशीत संशयितांनी आजरा, कोडोली येथील गुन्ह्याची कबुली दिली. दि. 26 डिसेंबर रोजी आजरा हायस्कूलजवळ संशयिताने हौसा शामराव भाईगडे (वय 65, रा. मडिलगे) यांच्याकडील दागिने भरचौकात लुटले होते.
मध्यवर्ती चौकात नाकाबंदी सुरू आहे. पोलिस तपासणी करत आहेत. दंगल सुरू आहे. दगडफेक सुरू आहे. एव्हाना वाटमारी सुरू असल्याचे भासवून वृद्ध महिलांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांवर सराईत डल्ला मारत होते.स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने टोळीला जेरबंद केल्याने दागिने लुटमारीचे अनेक गुन्हे उघड होणे शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.