

कोल्हापूर : मिरज शहरातील मध्यवर्ती चौकात भरदिवसा गोळीबार करून पोलिसांना गुंगारा देणार्या कुख्यात गुन्हेगार सुरज चंदू कोरे (25, रा. ढेरे गल्ली, मिरज) याच्यासह 6 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिरोली एमआयडीसी येथील एका हॉटेलमधून सापळा रचून अटक केली. या कारवाईत गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, धारदार सुरा, 9 मोबाईल आणि अंदाजे 20 लाख रुपये किमतीची आलिशान मोटार असा एकूण 22 लाख 21 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई गुरुवारी (ता. 19) मध्यरात्री करण्यात आली. या टोळीने पुणे-बंगळूर महामार्गालगत शिरोली एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलमध्ये लपून वास्तव्य केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ छापा टाकून कारवाई केली. टोळीचा म्होरक्या सुरज कोरे याने 18 जून रोजी मिरजेतील मध्यवर्ती चौकात भरदिवसा गोळीबार करून परिसरात दहशत निर्माण केली होती. तेव्हापासून तो पोलिसांच्या रडारवर होता.
सुरज कोरेसह प्रथमेश सुरेश ढेरे (25, ढेरे गल्ली, मिरज), विशाल बाजीराव शिरोळे (24,), पवनसिंग संजयसिंग राजपूत (27), सरफराज बाळासाहेब सय्यद (23) आफताब आयुब गाझी (24, चौघे रा. मंगळवार पेठ, मिरज) अशी अटक केलेल्या सराईताची नावे आहेत. यापैकी सुरज कोरे याने मिरजेतील मध्यवर्ती चौकात 18 जूनला गोळीबार करून दहशत माजविली होती. मिरज पोलिस त्याच्या मागावर होते. प्रथमेश ढेरे, विशाल शिरोळे, पवनसिंग राजपूत, सरफराज सय्यद याच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.
टोळीने महामार्गावरील हॉटेलमध्ये आसरा घेतल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी मध्यरात्री खोली क्रमांक 301 मध्ये छापा टाकून सर्वांना ताब्यात घेतले. संशयितांच्या ताब्यातून गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, एक धारदार सुरा, 9 मोबाईल आणि आलिशान कार असा एकूण 22 लाख 21 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी शिरोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.