कोल्हापूर : ‘डीजे’ दणाणला, ‘लेसर’ही नाचला

मूठभरांची हौस गौरवशाली परंपरेच्या मुळावर
Ganeshotsav Procession DJ, Laser
बंदी झुगारून काही मंडळांनी मिरवणुकीत डीजे आणला आणि लेसर किरण नाचवले.Pudhari File Photo
Published on
Updated on
राजेंद्र जोशी

कोल्हापूर : कोल्हापुरात बुधवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीने उत्सव ‘इव्हेंट’कडे सरकत असल्याची घंटा वाजवली. पुरोगामी विचार आणि प्रबोधनाच्या परंपरेने आपले नाव देशभर पोहोचविलेल्या मूठभर तरुणाईने धिंगाणा घातल्यामुळे सर्वत्र कोल्हापूरचे नाव झळकले. पोलिसांनी डीजे आणि ‘लेसर’वर बंदी जाहीर करूनही मिरवणुकीत डीजेचा दणदणाटही झाला आणि ‘लेसर’नेही काम फत्ते केले. यामुळे गौरवशाली परंपरेला गालबोट लागत आहे. यावर कोल्हापूरकर गप्प कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. साहजिकच या परंपरेला गालबोट लावणार्‍या प्रवृत्तींना खड्यासारखे बाजूला काढण्याची वेळ आली आहे; अन्यथा परंपरा कलंकित होतील. त्याहीपेक्षा नव्याने ‘गुंडाराज’ येण्याचा धोका अधिक आहे.

प्रबोधनाचे गाव म्हणून सर्वपरिचित असलेल्या कोल्हापूरने गणेशोत्सवाचा सामाजिक प्रबोधनासाठी कसा उपयोग करून घेता येतो, याचा आदर्श ठेवला. नदी प्रदूषणाच्या चढत्या पातळीला लगाम घालण्यासाठी ‘विज्ञान प्रबोधिनी,’ ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ आणि ‘आम्ही भारतीय लोक आंदोलन’ या संघटनांच्या मूठभर कार्यकर्त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तमाम कोल्हापूरकरांनी घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन महापालिकेने व स्वयंसेवी संघटना, कार्यकर्ते यांनी ठेवलेल्या कुंडांमध्ये करून मूर्तिदान योजनेचा नवा आदर्श निर्माण केला. माधवराव सानप या पोलिस अधिकार्‍यांच्या प्रयत्नातून ‘एक गाव एक गणपती’ ही आदर्श परंपराही कोल्हापूरनेच सुरू केली. प्रबोधनाचे देखावे, सामाजिक उपक्रम राबवून कोल्हापूरकरांनी प्रबोधनाची चळवळ निर्माण केली होती; पण मूठभर हुल्लडबाज या परंपरेला गालबोट लावत आहेत. यामुळेच आता बाह्यशक्तीही कोल्हापूरचे प्रबोधन करू लागल्या आहेत. ती थांबविणार की नाही, ते आव्हान आहे.

गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत जिल्हा प्रशासनाने डीजे व ‘लेसर’ला बंदी घातली. तसा तो कायदा आहे; परंतु ही बंदी झुगारून काही मूठभर मंडळांनी मिरवणुकीत डीजे आणला आणि लेसर किरण नाचवले. त्याचे दुष्परिणाम किती निष्पापांना सहन करावे लागले, त्याचे मोजमाप लवकरच कळेल; पण त्यामुळे प्रशासनाच्या आवाहनाचा आदर करणार्‍या मंडळांची भूमिकाही झाकोळली गेली. ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार 45 ते 55 डेसिबल ध्वनीची मर्यादा अपेक्षित असताना मिरवणुकीत ध्वनीची तीव्रता 95 डेसिबलपर्यंत पोहोचली. विसर्जन मार्गावर अनेक रुग्णालये आहेत. सीपीआर रुग्णालयाजवळही मोठी ध्वनितीव्रता नोंदविली गेली. यामुळे अनेक रुग्णांवरही परिणाम झाल्याची शक्यता नोंदवता येत नाही. वैद्यकीय भाषेत त्याला संथ गतीने होणारे परिणाम म्हटले जाते. आता पोलिसांनी 100 हून अधिक मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. काही नव्याने दाखल केले जातील; पण या कर्णकर्कश आवाजाने आणि डोळ्यांना इजा करणार्‍या ‘लेसर’ने नागरिकांच्या आरोग्याचे जे नुकसान केले आहे, त्याला जबाबदार कोण? खरे तर त्याचवेळी या डीजेंना लगाम घातला असता, तर पोलिस यंत्रणाही प्रशंसेला पात्र ठरली असती. यापूर्वी काही अधिकार्‍यांनी ते करून दाखवले होते. यामुळेच पोलिस यंत्रणेलाही आपले अपयश पदरात घ्यावे लागेल.

कायदा मोडणे, हे पुरुषार्थाचे लक्षण ठरत आहे. पोलिसांबरोबर वाद घालणे, प्रसंगी त्यांची कॉलर पकडणे याला तरुणांचा आयकॉन समजण्याची वृत्ती बळावते आहे. शर्टाची वरील दोन बटणे काढून छाती फुरफुरली, की नेता होते येते, असा भ्रम तरुणाईच्या डोक्यात जातो आहे. अशा प्रकारातून तयार झालेले नेतृत्त्व खंडणीच्या मागे लागते. तरुणांचे भवितव्य बिघडविण्यास कारणीभूत ठरते. परंपरेला गालबोट लावण्यात त्यांना धन्यता वाटते. अशा प्रवृत्तींचे लाड किती दिवस सहन करायचे?, याचा सोक्षमोक्ष करण्याची वेळ आली आहे. अशांना वठणीवर आणण्यासाठी कोल्हापूरकरांनीच पुढाकार घेतला पाहिजे. राजाश्रय देणार्‍यांनाही निक्षून सांगितले पाहिजे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news