

मुंबई: राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीज दरात विशेष सवलत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ऊर्जा विभागाच्या मुख्य सचिवांना पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी राज्यभरातील सार्वजनिक मंडळे तयारीला लागली आहेत. या काळात मंडळे विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवतात, ज्यामुळे विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने 'राज्य उत्सव' म्हणून घोषित केलेल्या या सणासाठी मंडळांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो.
सध्याच्या नियमांनुसार, तात्पुरत्या वीज कनेक्शनसाठी मंडळांना पहिल्या १०० युनिटपर्यंत ₹४.७१ प्रति युनिट दर आकारला जातो. मात्र, १०० युनिटच्या पुढे विजेचा वापर गेल्यास हा दर ₹१०.२९ ते ₹१६.६४ प्रति युनिट पर्यंत वाढतो. रोषणाई, देखावे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे मंडळांचा वीज वापर सहजपणे १०० युनिटच्या पुढे जातो, ज्यामुळे वाढीव दरामुळे येणारे बिल मंडळांसाठी परवडणारे नसते.
या पार्श्वभूमीवर, आमदार क्षीरसागर यांनी मागणी केली आहे की, गणेशोत्सव काळापुरती विशेष सूट म्हणून १०० युनिटच्या वरील वीज वापरासाठीही ₹४.७१ प्रति युनिट हाच सवलतीचा दर कायम ठेवावा.
आमदार क्षीरसागर यांच्या मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी हे निवेदन तात्काळ ऊर्जा विभागाच्या मुख्य सचिवांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे, राज्यभरातील लाखो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीज बिलात लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, मंडळांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.