

कोल्हापूर : घराघरांत, तालीम मंडळांत 40 दिवसांनंतर चैतन्याचा वर्षाव घेऊन येणार्या गणेशोत्सवाचे पडघम सध्या कोल्हापुरातील कुंभारवाड्यांमध्ये वाजू लागले आहेत. माती, प्लास्टरच्या गोळ्यांना बाप्पांच्या अनेकविध रूपांमध्ये घडवणारे मूर्तिकारांचे हात आता अखेरचा टप्पा पूर्ण करत आहेत. रात्रीचा दिवस करून तयार केलेल्या गणेशमूर्ती परगावी पाठवण्याची लगबग शिगेला पोहोचली आहे. कलेचा अधिपती अर्थात गणरायाच्या मूर्तीवर कुंभारवाड्यातील प्रत्येक घरात मायेचा कुंचला फिरत आहे.
यंदा 27 ऑगस्टला गणरायाचे आगमन होणार आहे. अजून सव्वा महिन्याचा अवधी असला तरी शहरातील बापट कॅम्प, शाहूपुरी, पापाची तिकटी, गंगावेश, फुलेवाडी येथील कुंभारवाडे, कुंभार गल्ल्यांमध्ये गणेशोत्सवाचा माहौल आहे. घरालगतच अनेक मूर्तिकारांनी मंडप उभारून बाप्पांच्या मूर्तींचे काम सुरू केले होते. पावसापासून मूर्तींना सुरक्षित ठेवण्यासाठी शेड उभारले आहेत. कुंभारांची घरे मूर्तींनी भरली आहेत. आकाराला आलेल्या कच्च्या मूर्तींवर महिन्यापासून रंगाचे हात फिरवले जात होते. आता मात्र मूर्तीवरील कलाकुसर, अलंकार, सजावट यांच्या सर्जनशीलतेचे कसब पणाला लावण्यात कुंभारांचे सारे कुटुंबच रंगले आहे. शहरासह सीमेबाहेरही मूर्तींची मागणी वाढल्याने कलाकारांच्या हातांना वेग आला आहे.
अनेक कारखान्यांमध्ये परगावी जाणार्या मूर्तींवर अखेरचा हात फिरवला जात आहे. नाक-डोळ्यांची रेखीव मांडणी, मुकुट-सोंडेवर आखीव रंगकाम, साजशृंगार, हलकासा झळाळीचा टच या गोष्टींमध्ये कलाकार अत्यंत बारकाईने लक्ष देत आहेत. कुंभार समाजातील महिला, युवकही मूर्तीकामात झोकून देत आहेत.
यंदा लालबागचा राजा आणि चिंतामणी, पोटल्या या शैलीतील मूर्तींना मागणी आहे. माय-बाप स्टाईल, सिंहासनावरील गणपती आणि नृत्यगणपती या मूर्तींचीही लोकप्रियता टिकून आहे. भाविकांची रुची लक्षात घेऊन मूर्तिकार मूळ डिझाईनमध्ये हलकेसे बदलही करत आहेत. देवदेवतांच्या, संतांच्या रूपातील मूर्तींचीही ऑर्डर यंदा वाढली आहे.
ज्यांच्या मूर्ती तयार आहेत, त्या मोठ्या काळजीपूर्वक पॅक केल्या जात आहेत. प्रथम थर्माकोल शीट, मग प्लास्टिक कव्हर, त्यानंतर दोरीने घट्ट बांधून टेम्पोमध्ये चढवण्याची तयारी सुरू आहे. पाच ते सात फुटांपर्यंतच्या मूर्ती पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, गोवा आणि बेळगाव येथे पाठवण्यासाठी गाड्या बुकिंग सुरू झाले आहे. यंदा शासनाने अटींसह पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) मूर्ती निर्मितीस विसर्जनाच्या अटीसह परवानगी दिल्यामुळे कुंभारवाड्यात मोठ्या प्रमाणात मूर्ती तयार झाल्या आहेत.