

विशाळगड : सार्वजनिक गणेशोत्सवात अनेकदा निर्माण होणारे गट-तटाचे राजकारण आणि स्पर्धात्मक वादांना फाटा देत शाहूवाडी तालुक्यातील 22 गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना स्वीकारून सामाजिक एकोप्याचा आदर्श घालून दिला आहे. या स्तुत्य उपक्रमामुळे गावागावांत शांतता आणि सलोख्याचे वातावरण निर्माण झाले असून, उत्सवाचा मूळ उद्देश खर्या अर्थाने सफल होत असल्याचे चित्र आहे.
पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात अनेक वर्षांपासून ही संकल्पना राबवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. याचा मुख्य उद्देश गावांमध्ये सण-उत्सवाच्या काळात शांतता टिकवून ठेवणे आणि सामाजिक सलोखा वाढवणे हा आहे. यंदा या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. शाहूवाडी तालुक्यात एकूण 520 सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी झाली असली तरी, 22 गावांनी मिळून एकच गणपती बसवण्याचा एकमुखी निर्णय घेतला. या निर्णयामुळे केवळ प्रशासनावरील ताण कमी झाला नाही, तर गावातील अनावश्यक स्पर्धा आणि त्यातून निर्माण होणारी कटुता टाळण्यातही मोठे यश आले आहे.
या 22 गावांच्या सकारात्मक भूमिकेचे पोलिस दलाने कौतुक केले आहे. सामाजिक सलोखा आणि एकतेची भावना जपणार्या या गावांना पोलिस दलातर्फे लवकरच प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, असेही घेरडे यांनी सांगितले. आकर्षक मूर्ती, मनमोहक रोषणाई आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणारा हा उत्सव या गावांमध्ये एकतेचे प्रतीक बनला आहे. शाहूवाडीतील या गावांनी घालून दिलेला हा आदर्श इतर गावांनाही निश्चितच प्रेरणा देणारा ठरेल. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. याच पार्श्वभूमीवर, शाहूवाडी तालुक्याने आदर्श निर्माण केला आहे.
स्तुत्य उपक्रम जपणारी गावे
‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबवणार्या गावांमध्ये विशाळगड, गेळवडे, पारिवणे, शेंबवणे, कातळेवाडी, परळे, मरळे, कुंभवडे, मोसम, घोळसवडे, म्हाळसवडे, शाहूवाडी, पेरिड, बर्कि, टेकोली, सांबु, ससेगाव, मालेवाडी, हुंबवली, वाकोली, घोळसवडे आणि पळसवडे यांचा समावेश आहे.