

कोल्हापूर : गणेश आगमन मिरवणुकीत दणदणाट करणार्या साऊंड सिस्टीमचा वापर टाळा, असे आवाहन करूनही जिल्ह्यात 327 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ध्वनी पातळी मर्यादेचे उल्लंघन केले आहे, असे पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी सांगितले. संबंधित मंडळांचे पदाधिकारी, ध्वनी सिस्टीम यंत्रणा व वाहन चालकांवर खटले दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
गुरुवारी सायंकाळी पोलिस मुख्यालय येथे पोलिस उपअधीक्षक, प्रभारी अधिकारी, मंडळांचे पदाधिकारी, ध्वनी सिस्टीम यंत्रणांचे मालक यांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली होती. प्रशासनाने दिलेल्या सूचना व नियमांचे सर्वांनीच पालन करावे, असे आवाहन करून गुप्ता म्हणाले, 6 सप्टेंबरला शहर व जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणूक होत आहे. मिरवणुकीदरम्यान ध्वनी सिस्टीम मालकांनी त्यांच्या साऊंड सिस्टीममध्ये ‘प्रेशर मिड’ तंत्राचा वापर करू नये, साऊंड सिस्टीमसमोर सीओ 2 गॅसचा वापर करण्यात येऊ नये.
गणराय आगमन मिरवणुकीत आदेशांसह नियमांचे उल्लंघन करून साऊंड सिस्टीमचा दणदणाट करणार्या राजारामपुरी परिसरातील 32 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांसह पदाधिकारी, साऊंड सिस्टीम आणि ट्रॅक्टर ट्रॉली मालकांविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हे दाखल करण्यात आले. आदेशाचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध थेट खटले दाखल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दिले आहेत. साऊंड सिस्टीम यंत्रणेसह ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्याचे आदेशही पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.