

कोल्हापूर : गणेशोत्सवामध्ये धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्य जोपासण्यासाठी जिल्ह्यातील 52 गावांत यावर्षी ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे गावागावांत गणेशोत्सव साजरा करण्याची ऐक्याची परंपरा निर्माण होणार असून, अनावश्यक खर्च टाळला जाणार आहे.
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. त्यामुळे निवडणुकीत मंडळांनी आपल्यासोबत राहावे म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुकांनी आतापासून पेरणी करण्यास सुरुवात केली असल्याने मंडळांना ‘लाखमोला’ची किंमत आली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील 52 गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेऊन आपले वेगळेपण दाखवत सामाजिक ऐक्याची परंपरा टिकविण्याचा प्रयत्न केला आहे.
या उपक्रमांत सर्वाधिक सहभाग पन्हाळा तालुक्यातील 24 गावांचा आहे. त्यानंतर गडहिंग्लज तालुक्यातील 11 गावे हा उपक्रम राबविणार आहेत. यामुळे गणेशोत्सवाच्या काळातील अनावश्यक खर्च, ध्वनिप्रदूषण, विजेचा वापर आणि विसर्जनावेळी होणारे पर्यावरणीय नुकसान कमी होण्यास मदत होणार आहे. पन्हाळा, गडहिंग्लजशिवाय कागल तालुक्यातील 2, राधानगरी 4 आणि शाहूवाडी तालुक्यातील 5 गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविण्यात येणार आहे.