

कोल्हापूर : व्हिडीओ पार्लरच्या नावाखाली जुगार अड्डा चालविणाऱ्या शिवाजी पेठ येथील ‘पवित्रा व्हिडीओ गेम्स पार्लर’वर राजवाडा पोलिसांनी शनिवारी छापा टाकला. पार्लरचा मालक आणि माजी नगरसेवक अजिंक्य शिवाजीराव चव्हाण (वय ३५, रा. शिवाजी पेठ) याच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल केला असून ५ संशयितांना ताब्यात घेतले. २१ व्हिडीओ मशिनरीसह ४ लाख ३६ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
चव्हाणसह रुद्राक्ष रणवीर जानकर (२३, रा. आर.के.नगर), ओंकार प्रकाश पाटील (३०, शिवाजी पेठ), सुबोध प्रवीण आमले (४१, सानेगुरुजी वसाहत), सचिन बाळू गोसावी (२३, केर्ली), अजित दीपक गोसावी (३०, केर्ली, ता. करवीर), जागामालक कल्याणी जीवन जाधव (गंगावेस) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गंगावेस ते रंकाळा बसस्थानक रोडलगत बाबुजमाल पोस्ट ऑफिससमोर राजकीय आश्रयाने बेधडक सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस निरीक्षक किरण लोंढेंसह पथकाने दुपारी कारवाई केली.