

कोल्हापूर : गगनबावडा पर्यटन तालुका म्हणून विकसित केला जाणार आहे. यासाठी महिनाभरात पर्यटनाचा सूक्ष्म आराखडा जिल्हा प्रशासनाकडे सादर करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. सर्व विभागांनी परस्परांशी समन्वयाने काम करून आपल्या विभागाचा प्रकल्प अहवाल सादर करावा, अशी सूचना आमदार चंद्रदीप नरके यांनी केली. गगनबावडा पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी बैठक झाली.
गगनबावडा परिसरात पावसाळ्यात देशभरातील पर्यटकांचा ओघ असतो. या भागाला भेट देणार्या पर्यटकांसाठी निवास व न्याहरीची चांगली व्यवस्था होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी गगनबावडा पर्यटन तालुका म्हणून घोषित करणे आवश्यक आहे. या भागात असणारी पर्यटन स्थळे व त्या ठिकाणी देण्यात येणार्या सुविधांच्या माहितीचा पर्यटन आराखड्यात समावेश करण्याची सूचना आ. नरके यांनी केली.गगनबावडा तालुक्यातील नैसर्गिक, ऐतिहासिक, धार्मिक व निसर्गरम्य पर्यटन स्थळांना देशातील व परदेशातील पर्यटक भेट देतात. वन, सार्वजनिक बांधकाम, एमटीडीसी, जलसंपदा आदी विभागांनी गगनबावडा तालुक्यातील विविध पर्यटन स्थळांना येत्या 8 दिवसांत भेटी देऊन त्या त्या ठिकाणांच्या पर्यटन विषयक माहितीवर आधारित सूक्ष्म आराखडा येत्या महिनाभरात सादर करावा. त्यानंतरच्या महिनाभरात पर्यटन विभागाकडून हा आराखडा अंतिम होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
या परिसरात असणारी प्राचीन, पर्यटन, धार्मिक, ऐतिहासिक, वन पर्यटन स्थळे, निवासासाठी योग्य ठिकाणे, पर्यटकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा अशा सर्व बाबींचा समावेश या आराखडा केला जाणार आहे.