

गडहिंग्लजल : प्रवीण आजगेकर
गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा कधी नव्हे इतके जातीय समीकरण अभ्यासले जात आहे. कोणाला उमेदवारी दिली तर ही समीकरणे जुळतील याचा अभ्यास करून खलबते सुरू असल्याने यामध्ये विकासकामे तसेच प्रलंबित कामे दुर्लक्षित होऊन केवळ जातीय समीकरणाचाच अभ्यास सुरू आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांना रोखण्यासाठी जनता दलाने विरोधकांची तगडी आघाडी करण्याचे नियोजन लावले असल्याने गडहिंग्लजच्या निवडणुकीत आता वेगळाच रंग भरू लागला आहे. वास्तविक गडहिंग्लज पालिकेची निवडणूक ही केलेली विकासकामे तसेच प्रलंबित कामे यावर होणे अपेक्षित असताना सध्या दोन्ही आघाड्यांकडून होत असलेल्या चर्चामध्ये जातीय समीकरणांची नांदी दिसत आहे.
नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव असून यामध्ये दोन्हीकडून इच्छुकांची संख्या अधिक आहे. मात्र यामध्ये बेडा जंगम समाजही येत असल्याने स्वामीपैकी एकाला उमेदवारी देऊन लिंगायत समाजाची मते वळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकाकडून गडहिंग्लज पालिकेतून... ही उमेदवारी दिल्यास दुसरीकडूनही अशाच प्रकारे उमेदवारी दिली जाणार आहे. गडहिंग्लज शहराला वाहतुकीच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी रिंगरोडशिवाय पर्याय नाही.
शहरातील कचरा डेपोची मोठी समस्या आहे. सांडपाणी प्रकल्प हा शहरवासीयांसाठी आताच्या घडीला सर्वात मोठा प्रश्न असून यावर फारसा फोकस न होता केवळ शह-काटशहाचे नियोजन दोन्हीकडून सुरू आहे. मुश्रीफांनी महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याचे ठरवले असले तरी जनता दलानेही महायुतीच्या घटक पक्षांकडे गाठीभेटी वाढवल्याने खुद्द भाजपमध्येच दोन गट पडले आहेत.
गडहिंग्लजच्या निवडणुकीत मुश्रीफांना टक्कर देण्यासाठी जनता दलाकडून सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू असताना राष्ट्रवादीनेही जनता दलाच्या मुख्य कार्यकर्त्यांना फोडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला बरीच उकळी फुटली आहे. या सर्व चर्चेत केवळ राष्ट्रवादी व जनता दलच आघाडीवर असून राज्यात बहुचर्चेत असलेल्या काँग्रेस, भाजप, शिवसेना दोन्ही गटांना मात्र या दोघांसोबत जाण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही.
गडहिंग्लजकरांनाही शहराच्या समस्येपेक्षा जातीय समीकरणासह फोडाफोडीचे राजकारण आवडते की खऱ्या अर्थान गडहिंग्लजच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणे आवडते हे मात्र आगामी काळ ठरवणार असून या निवडणुकीत गडहिंग्लज शहराची पुरोगामी ही भूमिका कशी आहे हे पाहावयास मिळणार आहे.
जनता दल व राष्ट्रवादी दोघेही सत्ताधारी
गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाताना परस्परविरोधी लढणारे जनता दल व राष्ट्रवादी दोघेही सत्ताधारीच म्हणून सामोरे जाणार आहेत, जनता दलाने मागील पाच वर्षे सत्ता भोगली आहे, तर प्रशासक कालावधीतील तीन वर्षे राष्ट्रवादीनेच सत्तेवर अंकुश ठेवला आहे. त्यामुळे दोघांनाही सत्ता कालावधीत काय केले हे जनतेला सांगावे लागणार आहे.