

पेठवडगाव : उत्तर कर्नाटकातील गदग येथे सराफी दुकान फोडून लाखोंच्या दागिन्यांसह पसार झालेल्या चोरट्यास वडगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत किणी टोल नाक्यावर सापळा रचून अटक केली. महम्मद हुसेन (रा. नागपूरवाला चाळ, अहमदाबाद) असे त्याचे नाव असून, 80 लाख रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे.
बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास गदग येथील नारायण कुरुडकर यांचे शांतिदुर्ग ज्वेलर्स दुकान फोडून चोरी करण्यात आली होती. सोन्या-चांदीचे दागिने, मूर्ती, मौल्यवान रत्ने, खडे आणि रोख रक्कम असा जवळपास 80 लाखांचा ऐवज चोरट्याने दोन बॅगांमध्ये भरून पोबारा केला होता. भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे कर्नाटक पोलिसांपुढे तपासाचे आव्हान होते. कर्नाटक पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना चोरटा एकटाच असल्याचे आणि गदगहून हुबळीला जाणारी बस पकडल्याचे स्पष्ट झाले. पुढील सीसीटीव्ही तपासात तो दांडेली-कोल्हापूर-मुंबई जाणार्या कर्नाटक परिवहनच्या बसमधून प्रवास करत असल्याचे आढळले. ही माहिती मिळताच कर्नाटक पोलिसांनी कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधला.
कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी तत्काळ वडगाव पोलिसांना या चोरट्याला पकडण्याचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक माधव डिगोळे, फौजदार आबा गुंडणके, महेश गायकवाड, अनिल आष्टेकर, राजू साळुंखे आदींच्या पथकाने किणी टोल नाक्यावर पाळत ठेवून सापळा रचला. सायंकाळी साडेचारच्या सुमारास बस टोल नाक्यावर थांबताच पथकाने बसमध्ये प्रवेश करून महंमद हुसेनच्या मुसक्या आवळल्या आणि दोन्ही बॅगांसह वडगाव पोलिस ठाण्यात आणले.
दरम्यान, चोरट्याच्या मागावर असलेले गदगचे उपविभागीय पोलिस अधिकारी मुर्तझा कादरी आणि पोलिस निरीक्षक धीरज शिंदे वडगावात दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत बॅगांची मोजदाद केली असता, 19 किलो चांदीचे दागिने, 70 ग्रॅम सोने, मौल्यवान खडे, विविध रत्ने, चांदीच्या मुलाम्याच्या मूर्ती आणि रोख रक्कम असा मुद्देमाल आढळला. संपूर्ण मुद्देमाल आणि महंमद हुसेन याला पुढील कारवाईसाठी कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.