

जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथे अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. ज्या पत्नीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, जिचे रक्षाविसर्जनही झाले, तीच पत्नी 11 व्या दिवशी जिवंत परतल्याने संपूर्ण गाव हादरून गेले आहे. उदगाव येथे घडलेल्या या विचित्र घटनेमुळे, ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले गेले, ती महिला नेमकी कोण होती, असा गूढ प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकाराने पतीसह नातेवाईकांना धक्का बसला असून, पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे.
उदगाव येथील संजना महेश ठाणेकर (वय 37) या 19 ऑगस्ट रोजी घरातून बेपत्ता झाल्या होत्या. पतीने जयसिंगपूर पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, 29 ऑगस्ट रोजी मिरज तालुक्यातील निलजी बामणी येथे कृष्णा नदीत एका महिलेचा मृतदेह सापडला. मृतदेह फुगल्याने चेहरा ओळखण्यापलीकडचा होता. मात्र, अंगावरील कपडे आणि गालावरील तिळाच्या खुणेवरून पती महेश ठाणेकर यांनी तो पत्नी संजनाचाच असल्याचे ओळखले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात मृतदेहावर अंत्यसंस्कार करून रक्षाविसर्जनही करण्यात आले.
सर्व विधी पार पडल्यानंतर, बुधवारी (दि. 30) अचानक संजना गावात एका बचत गटाचे पैसे देण्यासाठी अवतरल्या. त्यांना जिवंत पाहून ग्रामस्थांचा थरकाप उडाला. ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी संजना यांना पोलिस ठाण्यात बोलावले. घरगुती कारणावरून आपण तासगाव आणि बारामती येथे गेल्याचे त्यांनी सांगितले. संजना जिवंत परतल्याने कुटुंबाला आनंद झाला असला, तरी आपण ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले, ती अज्ञात महिला कोण होती, या विचाराने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
उदगाव येथील एक महिला बेपत्ता झाल्यानंतर नदीत सापडलेल्या मृतदेहाला पतीने पत्नीचा समजून अंत्यसंस्कार केले. मात्र, अकराव्या दिवशी बेपत्ता पत्नी जिवंत परतल्याने सर्वांनाच धक्का बसला. या विचित्र घटनेमुळे ज्या अज्ञात महिलेवर अंत्यसंस्कार झाले, तिची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या प्रकाराने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.