कोल्हापूर ः वेळ रात्री नऊची. फुलेवाडी फायर स्टेशन इमारतीचा स्लॅब टाकायचे काम अंतिम टप्प्यात होते. केवळ एक ब—ास काम बाकी होते. स्लॅब टाकत असताना चार कर्मचारी वर उभे होते तर दोन कर्मचारी काम पूर्ण झाल्याने खाली थांबले होते. इतक्यात करर्र्ऽऽकर्रऽऽ असा आवाज झाला. स्लॅबवर उभ्या असणार्या चौघांनी उड्या मारल्या. त्यामुळे ते बचावले तर खाली थांबलेल्या दोघापैकी नवनाथ कागलकर स्लॅबखाली अडकला.
फुलेवाडी फायर स्टेशन नवीन इमारत बांधण्यासाठी 49 लाख रुपये मंजूर झाले होते. या निधीतून ही दोन मजली इमारत बांधण्याचे काम सुरू होतेे. पुढच्या बाजूला फायरची मोठी गाडी जाण्यासाठी पहिला स्लॅब न टाकता जागा रिकामी सोडण्यात आली होती; तर पाठीमागच्या बाजूला दोन मजले तयार करण्यात आले होते. इमारतीच्या पुढच्या बाजूला सुमारे 20 ते 22 फूट उंचीवर हा पहिलाच स्लॅब होता. हे काम शशिकांत पोवार यांच्या रेणुका कन्स्ट्रक्शनला देण्यात आले होते. स्लॅब टाकण्याचे नियोजन होते. दिवसभर स्लॅब जोडून सायंकाळी स्लॅब टाकण्याचे काम सुरू झाले. तत्पूर्वी सकाळी या कामाचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले होते. उपशहर अभियंता सुरेश पाटील यांनीही प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन पाहणी केली होती. स्ट्र्क्चर ऑडिटचा रिपोर्ट पाहिल्यानंतर हे काम सुरू झाले. संपूर्ण स्लॅब पूर्ण होत आला होता. केवळ एक ब—ास काम बाकी होते. इतक्यात कट...कट... आवाज झाला. वरच्या मजल्यावर असलेल्या चौघांनी थेट खाली उड्या मारल्या; तर खाली थांबलेले दोघे या स्लॅबखाली अडकले.
जुन्या फायर स्टेशन इमारतीच्या बाजूलाच हे काम सुरू होते. त्यामुळे घटना तत्काळ लक्षात आली. मोठा आवाज झाल्याने नागरिक देखील मदतीसाठी धावले. दोन अग्निशमन वाहने, दोन रुग्णवाहिका, दोन जेसीबी मशिन, फायर बि—गेडचे सर्व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी आले. मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरू झाले. गॅस कटरच्या सहाय्याने सळ्या तोडून अडकलेल्या एकेकांना बाहेर काढून उपचारासाठी त्यांना तत्काळ सीपीआरमध्ये नेण्यात आले.