

चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : दोन पक्षांचे चार पक्ष झाले. अधिकच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थोडीफार जागा वाटपाची घासाघीस होऊन सगळं सुरळीत पार पडेल, असा विश्वास नेत्यांना असताना आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या राधानगरी-भुदरगड मतदारसंघातच बंडखोरीचे वारे वाहू लागले आहे. के. पी. पाटील यांनी तशी घोषणाच करून या वार्याला जोर दिला आहे, तर महाविकास आघाडीतही धुसफुस चव्हाट्यावर आली असून निवडणुकीपूर्वीच रंगलेल्या मानापमानाच्या खेळाने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
मुळातच जागा मर्यादित. त्यामध्ये इच्छुकांची संख्या जास्त. जिल्ह्यात साखर कारखाने, सहकारी संस्थांचे मोठे पेव. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत उमेदवारी देण्याची दाखवलेली तयारी या पार्श्वभूमीवर बंडखोरी अटळ आहे.
निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी मेळावे, बैठका, सभा वाढू लागल्या आहेत. प्रकाश आबिटकर यांच्या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून झालेल्या मेळाव्यात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवार राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी बंडखोरीचा राग आळविला. सन्माननीय तोडगा निघत असेल, तरच आम्ही युतीबरोबर अन्यथा कार्यकर्ते सांगतील ती आमची दिशा असेल. काही झाले तरी कार्यकर्त्यांना वार्यावर सोडणार नाही आणि त्यांचे वाटोळे करणार नाही, अशी टोकाची भूमिका जाहीर करून के. पी. पाटील यांनी वादाला बत्ती दिली आहे. के. पी. पाटील यांच्या या वक्तव्याने महायुतीतील घटक पक्षाची भूमिका स्पष्ट झाली आहे.
महायुतीत अंतर्गत संघर्ष खूप आहेत. जिल्ह्यातील दोन मंत्र्यांमध्ये धुसफूस मोठ्या प्रमाणावर आहे. ती एवढी टोकाला गेली आहे की, शासकीय विश्रामगृहाच्या भुदरगड या कक्षावर अधिकार कोणाचा, यावरून आबिटकर आणि मुश्रीफ यांच्यातील संघर्ष जिल्ह्याने पाहिला. अखेर आबिटकर यांनी आपल्या नावाचा फलक या कक्षावर लावला.
नेत्यांमध्ये अशा घटना घडत असताना थांबतील तर त्यांचे ते अनुयायी कसले?
त्यांनीही नेत्यांचा कित्ता गिरवत वेगळी भूमिका मांडली आहे. अर्थात, हे सगळे जर-तरचे आहे. आपल्या ताटात सर्वाधिक वाटा घेण्यासाठी अशी टोकाची भूमिका घेतली जात आहे, हे स्पष्ट दिसते; मात्र यातून जनतेत जाणारे चित्र हे बेबनावाचेच आहे.
एका बाजूला महायुतीत अशी स्थिती असताना दुसरीकडे महाविकास आघाडीतही धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. यावेळी ही धुसफुस गडहिंग्लजमधून सुरू झाली असून डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी वादाला बत्ती दिली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी इंडिया आघाडी म्हणून शाहू महाराज यांच्या विजयासाठी आपण व आपल्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले असताना विधानसभा निवडणुकीतच महाविकास आघाडीतील काहींनी आपल्याला एकाकी पाडले. गद्दारीचे राजकारण केले. फसवणूक केली. पाठीत खंजीर खुपसला अशा शेलक्या शब्दांत महाविकास आघाडीतील विरोधकांवर निशाणा साधत अशा घटकांना जि. प., पंचायत समिती, गोकुळच्या निवडणुकीत घरी पाठविणार, अशी घोषणाच बाभूळकर यांनी केली. त्यामुळे महाविकास आघाडीतील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
महाविकास आघाडीतही सर्व काही ठिकठाक नाही, असे दिसत आहे. प्रत्येक तालुक्यात त्या - त्या गटाची कमी-जास्त प्रमाणात ताकद असते. उमेदवारी देताना या सगळ्यांचा विचार करावा लागतो. त्यामुळे आपल्या गटाचा आणि ताकदीचा विचार आतापासूनच व्हावा आणि विधानसभेतील पराभवाचा कलंक धुवून निघावा, यासाठी कदाचित बाभूळकर यांनी अशी भूमिका घेतली असेल. यावर काय करायचे, हे त्यांच्या पक्षातील नेते ठरवतील; मात्र सर्व काही ठिकठाक नाही, हेच यातून अधोरेखित झाले आहे.