

अनुराधा कदम
कोल्हापूर : राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे पुणे येथील फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत कोल्हापूर चित्रनगरी येथे लवकरच सिनेमा तंत्रज्ञान व चित्रपट प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. पटकथा लेखनापासून ते अंतिम संपादनापर्यंत चित्रपटनिर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावरील प्रशिक्षण या केंद्रात मिळणार आहे. यामुळे कोल्हापूर आणि परिसरातील अनेक तरुणांना चित्रपट, टेलिव्हिजन व डिजिटल माध्यमांमधील संधी उपलब्ध होतील. या कोर्सेसद्वारे प्रशिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक प्रोजेक्टस्मध्ये सहभागी होण्याची संधीही दिली जाणार आहे.
कोल्हापूर चित्रनगरी येथे गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या विकासकामांचे लोकार्पण 27 जून रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले होते. शेलार यांनी चित्रनगरीची पाहणी करून भविष्यातील योजनांबाबत घोषणा केल्या होत्या. गेल्या एक महिन्याच्या कालावधीत या घोषणांना मूर्त स्वरूप देण्याच्या द़ृष्टीने राज्याच्या सांस्कृतिक विभागस्तरावर महत्त्वाच्या घडामोडी झाल्या. याअंतर्गत एफटीआयआय या संस्थेशी सांस्कृतिक संचालनालयाने समन्वय साधला आहे. यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी पुढाकार घेतला.
चित्रनगरीची आढावा भेट झाल्यानंतर गेल्या महिनाभरात राज्यस्तरीय बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये मंत्री शेलार यांनी पुढील वीस वर्षांसाठी व्यापक आराखडा तयार करण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या होत्या. यासंदर्भात अंदाजपत्रक आणि दीर्घकालीन योजना तयार करण्याची प्रक्रिया गतीने सुरू झाली आहे. कोल्हापूर चित्रनगरीमध्ये दाक्षिणात्य सिनेनिर्मात्यांनी चित्रीकरणासाठी यावे, याबाबत काही करार करण्यासाठी संवाद सुरू आहे. सप्टेंबरमध्ये महाराष्ट्र, कर्नाटकसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील निर्मात्यांची बैठक घेण्यात येणार आहे.