

इचलकरंजी : येथील एका फळ विक्रेत्यावर सांगलीतील व्यावसायिकाने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कबनूर येथे घडली. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कबनूर ओढ्याजवळ ही घटना घडली असून, संजय बाबू बागेवाडी (वय 52, रा. तांबे माळ) असे जखमी फळ विक्रेत्याचे नाव आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे हल्लेखोर गजानन शिवलिंग मनवे (50, रा. खणभाग, सांगली) हा घटनेनंतर स्वतः शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हजर झाला.
संजय बागेवाडी यांचे व्यंकटराव हायस्कूल परिसरात फळ विक्रीचे दुकान आहे. रविवारी दुपारी ते आपल्या मुलाला दुकानावर थांबवून मोपेडवरून कबनूरच्या दिशेने गेले होते. कबनूर ओढ्याजवळ त्यांच्यावर कटरसारख्या धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बागेवाडी यांच्या डोक्यात आणि दंडावर गंभीर जखमा झाल्या. रक्तस्राव होत असूनही ते स्वतः मोपेड चालवत थेट आयजीएम रुग्णालयात पोहोचले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने कोल्हापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक शरद वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. हल्ल्यामागील नेमक्या कारणाचा शोध पोलिस घेत आहेत.
घटनेनंतर हल्लेखोर गजानन मनवे हा स्वतः गावभाग पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. मनवे हा सांगलीतील व्यावसायिक असून कबनूर ओढ्याजवळ बागेवाडी आणि मनवे यांच्यात काही कारणावरून वाद झाल्याचे समजते. तथापि, हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी मनवे याची मोटार ताब्यात घेतली असून तिची तपासणी करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी हा हल्ला नाजूक प्रकरणातून घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.