

प्रवीण ढोणे
राशिवडे : राज्यातील ऊस गळीत अंतिम टप्प्यात आला असताना राज्यातील 157 साखर कारखान्यांकडून सुमारे 4601 कोटींची एफआरपी थकली आहे. तर केवळ 49 कारखान्यांनी आर्थिक व्यवहार चोख ठेवत एफआरपी पूर्णपणे अदा केली आहे. तर कारखान्यांनी कर्मचार्यांचे पगारही थकवले आहेत.
चालू गळीत हंगामामध्ये राज्यातील 206 सहकारी, खासगी कारखान्यांनी गळीत हंगामामध्ये सहभाग घेतला होता. यामधील बहुतांश कारखान्यांनी हंगाम समाप्त केली आहे. आतापर्यंत गाळप झालेल्या उसाच्या बिलापोटी ऊसतोडणी, वाहतूक खर्चासह 33,697 कोटी रुपये एफआरपी पोटी अदा करावी लागते; परंतु यापैकी दि. 15 फेब—ुवारी अखेर 29 हजार 96 कोटींचीच एफआरपी अदा करण्यात आली आहे. म्हणजे आतापर्यंत 86.34 टक्के एफआरपी अदा करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 11, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील नऊ कारखान्यांची मोठ्या प्रमाणात थकबाकी राहिली आहे.
सद्यस्थितीत राज्यातील साखर कारखान्यांकडे अद्याप 4,601 कोटी रुपये थकीत आहेत. 80 टक्के ते 99 टक्के देणारे कारखाने 58 कारखाने, 60 टक्के ते 79 टक्के देणारे कारखाने 58 कारखाने आहेत. साखरेला अपेक्षित न मिळणारा दर, बगॅस, मोलॅसिससह उपपदार्थांना मिळणारे दर आणखी उत्पादन खर्च यांचा आर्थिक मेळच बसत नसल्याने आर्थिक घडी विस्कटलेल्या स्थितीत आहे. तर एफआरपीसह अन्य आर्थिक देणी अदा करण्यासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते, व्याज साठविताना दमछाक होत आहे, त्यातच एफआरपीसाठी उत्पादित साखरेवर मिळणारे कर्जही तुटपुंजे पडत आहे. त्यामुळे पंधरा दिवसांमध्ये एफआरपी अदा करण्याचा नियम नाईलाजाने किंवा आर्थिक नियोजन होत नसल्याने पायदळी तुडविला जात आहे.
49 कारखान्यांकडून संपूर्ण रक्कम अदा
राज्यातील केवळ 49 कारखान्यांनीच पूर्णपणे एफआरपी अदा केली आहे. उर्वरित कारखान्यांनी अद्याप पूर्णपणे एफआरपी अदा केलेली नाही, तर चार कारखान्यांनी अद्याप एक नवा रुपयाही शेतकर्यांना दिलेला नाही.
कर्मचार्यांचे पगारही थकीत
एफआरपी रक्कम मोठ्या प्रमाणात थकीत आहे, शिवाय काही कारखाने वगळता बहुतांश कारखान्यातील कर्मचार्यांचे दोन ते अकरा महिन्यांपर्यंतचे पगारही थकीत आहेत.