

प्रवीण ढोणे
राशिवडे : राज्यातील ऊस गळीत हंगाम सुरू होऊन दोन-अडीच महिने उलटले आहेत. आता गाळप वेगाने सुरू आहे; तर साखर उतार्यामध्येही वाढ होत आहे. परंतु पंधरा दिवसांमध्ये एफआरपी अदा करण्याचा नियम कागदावरच राहिला असून चालू हंगामातील 2 हजार 511 कोटीची एफआरपी थकीत राहिली आहे तर गतवर्षीच्या 140 कोटी एफआरपीचा पत्ताच नाही, अशी दयनीय अवस्था बनली आहे.
राज्यातील सहकारी, खासगी 197 साखर कारखान्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत 602.61 लाख मेट्रिक उसाचे गाळप केले. या गाळप झालेल्या ऊस बिलापोटी 15 हजार 874 कोटी देय एफआरपी रकमेपैकी 13 हजार 363 कोटींची एफआरपी अदा करण्यात आली आहे. त्यामुळे 2 हजार 511 कोटीची एफआरपी. थकीत राहीली आहे. शेतकर्यांना एफआरपी अदा करण्याची टक्केवारी 84.18 टक्के आहे. यामध्ये 57 कारखान्यांनी पूर्णतः तर 40 कारखान्यांनी 80 ते 99, टक्के, 50 कारखान्यांनी 60 ते 79 टक्के, 49 कारखान्यांनी 60 टक्क्यापेक्षा कमी एफआरपी अदा केली असून एकूण 139 कारखान्यांनी एफआरपी थकवली आहे. तर 38 कारखान्यांनी गतहंगामातील 140 कोटीच्या एफआरपीचा पत्ताच नाही, अशी स्थिती आहे. मुख्यतः खासगी पेक्षा सहकारी कारखान्यांनी दैनंदिन क्षमतेने मोठ्या प्रमाणात गाळप केले आहे. परंतु कारखान्यांवर अन्य असणार्या कर्जामुळे आर्थिक देणी भागविताना कारखान्यांना आर्थिक कसरत करावी लागत आहे. एफआरपी रकमेसाठी आर्थिक गोळाबेरीज करतानाही दमछाक होत आहे. प्रामुख्याने या हंगामासाठी ऊस मुबलक उपलब्ध असून कारखान्यांची दैनिक गाळप क्षमताही वाढली आहे. तर सरासरी उतार्यांमध्येही वाढ होत चालली आहे. काही कारखान्यांचे अपवाद वगळता अन्य कारखान्यांनी जाहीर केलेली एफआरपीची रकमेच्या आसपास रक्कम अदा केली आहे. पण आर्थिक अडचणींमध्ये असणारे कारखाने आर्थिक उपलब्धता करता उशिरा का असेना, एफआरपी देण्याचा प्रयत्न करत आहेत.
एफआरपीसाठीही कर्ज?
सहकारी कारखान्यांवर कर्जाचा मोठा बोजा आहे. आर्थिक देणी अदा करण्यासाठी उपसलेल्या कर्जाचे व्याज साठविताना घाम फुटत असताना, एफआरपीसाठीही कर्जाचा हत्यार उपसावे लागत आहे. परंतु कर्जाचा डोंगर असूनही काही दिवसांचा अवधी ठेवत एफआरपी अदा केली जात आहे.