

कोल्हापूर : दारू पिण्याच्या कारणावरून विक्रमनगर परिसरात मित्राने मित्राचाच दगडाने ठेचून खून केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. विकास दत्तात्रय भोसले (वय32, रा.येलूर-मलकापूर, ता. शाहूवाडी, सध्या रा. विक्रमनगर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित ओंकार महादेव काळे (वय 25, रा. शाहू कॉलनी, तिसरी गल्ली, विक्रमनगर, कोल्हापूर) याला रात्री उशिरा ताब्यात घेतले.
विकास गेल्या पाच वर्षांपासून विक्रमनगर परिसरात राहत होता. तो एका खासगी कंपनीत कामाला होता. काम सोडल्यानंतर तो मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करीत होता. याच दरम्यान त्याची परिसरातील ओंकारसोबत मैत्री झाली. त्याच्या घरी विकासची ये-जा होती. शनिवारी दिवसभर दोघे एकत्र होते. सायंकाळी सातच्या सुमारास ते परिसरातील एका दारुच्या गुत्त्यावर गेले. दोघांमध्ये दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला.
ओंकारने शिवीगाळ करत विकासला मारहाण करत त्याच्या डोक्यात दगड घातला. त्यामुळे विकास गंभीर जखमी झाला. त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत सीपीआर परिसरात विक्रमनगर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, राजारामपुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांनी घटनास्थळासह सीपीआरला भेट दिली.