

तानाजी खोत
कोल्हापूर : भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात 27 जानेवारी रोजी झालेल्या ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराने कोल्हापूरच्या फाऊंड्री उद्योगाला जागतिक स्पर्धेत एका रात्रीत आघाडीवर नेले आहे. आता कोल्हापुरात तयार होणार्या इंजिन ब्लॉक्स, ट्रान्समिशन हाऊसिंग आणि इतर कास्टिंग पार्टस्वरील 22 टक्क्यांपर्यंत असणारे आयात शुल्क पूर्णपणे शून्य झाले आहे. यामुळे फाऊंड्री उद्योगाला बूस्ट मिळाला आहे.
गेल्या वर्षभरापासून कोल्हापूरचा निर्यातदार उद्योजक मोठ्या संकटात होता. अमेरिकेने भारतीय इंजिनिअरिंग वस्तूवर 50 टक्क्यांपर्यंत रेसिप्रोकल टॅरिफ लावल्यामुळे कोल्हापूरच्या निर्यातीत 15 ते 20 टक्क्यांनी घट झाली होती. कोल्हापूरचे अनेक मोठे फाऊंड्री युनिटस् हे अमेरिकेतील ट्रक आणि ट्रॅक्टर उद्योगावर अवलंबून होते. मात्र, या कराराने आता युरोपचा 30 ट्रिलियन डॉलरचा बाजार पूर्णपणे खुला झाला असून, अमेरिकेने केलेली कोंडी फोडण्यासाठी कोल्हापूरला एक मजबूत पर्याय मिळाला आहे.
चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी चायना प्लस वन व्होल्क्सवॅगन, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज बेंझ, स्टेलांटीस (जीप, सिट्रॉन) सारख्या जागतिक कंपन्यांनी आता कोल्हापूरच्या उत्पादकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. कोल्हापूरच्या शिरोली, गोकुळ शिरगाव आणि पाचगाव औद्योगिक वसाहतींमधील सुट्या भागांसाठी युरोप आता मुख्य ग्राहक बनला आहे. विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांच्या अॅल्युमिनियम आणि एसजी आयर्न सुट्या भागांसाठी देखील कोल्हापूर हे जागतिक केंद्र बनू शकते. युरोपातील 27 देशांमध्ये आता कोल्हापुरी मालाला विनाशुल्क प्रवेश मिळेल. यामुळे किमतीत आपण चीन आणि तुर्कीला मागे टाकू शकतो.
स्वस्त आधुनिक तंत्रज्ञान : युरोपमधून येणार्या अत्याधुनिक मोल्डिंग लाइन्स आणि टेस्टिंग मशिनरीवरील कर 44 टक्क्यांवरून जवळजवळ शून्य झाला आहे. यामुळे कोल्हापुरातील छोट्या फाऊंड्रीनाही जागतिक दर्जाचे आधुनिकीकरण करणे परवडणारे होईल.