

कोल्हापूर : राज्य शासनाच्या मिशन सुधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३४ हजार ८३८ कार्डवरील सुमारे १ लाख ३७ हजारांवर लोकांचे रेशनवरील मोफत धान्य बंद केले जाणार आहे. त्यापैकी १८ हजार ४ कार्डवरील सुमारे ७२ हजार जणांचे धान्य शुक्रवारी बंद झाले. उर्वरित सुमारे ६५ हजारांवरील ग्राहकांचे रेशन रविवारपर्यंत बंद होईल.
रेशनवरून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत धान्य दिले जाते. मात्र, या योजनेचा गरज नसणारेही फायदा घेत असून, त्यामुळे गरजूंना धान्य मिळत नसल्याने राज्य शासनाने मिशन सुधार योजनेंतर्गत रेशन कार्डधारकांची पडताळणी सुरू केली. त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला रेशन कार्डधारकांची यादी देण्यात आली. त्यानुसार या कार्डधारकांची पडताळणी करून ही कार्ड मोफत धान्य देण्यात येणाऱ्या प्राधान्य कुटुंब योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
या मुद्द्यावर पडताळणी
उच्च उत्पन्न (२५ लाखांवरील उत्पन्न)
जादा उत्पन्न (६ लाखांवरील उत्पन्न)
कंपनी, संस्थेत संचालक
अशी आहे कार्ड संख्या
उच्च उत्पन्न- २९६
जादा उत्पन्न- ३०,९७४
कंपनी, संस्थेत संचालक-३,५६८
शुक्रवारअखेर झालेली कार्यवाही
उच्च उत्पन्न- १७३
जादा उत्पन्न- १६,११९
कंपनी, संस्थेत संचालक-१,७१२
जिल्ह्याचा इष्टांक केला कमी
राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांचा यावर्षीचा सुधारित इष्टांक २ जून रोजी जाहीर केला आहे. त्याबाबत आदेश जारी केला असून त्यात कोल्हापूरचा अंत्योदय कुटुंब इष्टांक ७५९ ने, तर प्राधान्य कुटुंब योजनेतील १३ हजार २६६ ने इष्टांक कमी झाला. नव्या सुधारित इष्टांकानुसार अंत्योदय योजनेतील ५१ हजार ५७८ कार्डवर, तर २३ लाख ३० हजार २८९ लोकांना मोफत धान्य मिळणार आहे. गतवर्षी अंत्योदय योजनेतील ५२ हजार ३३७ कार्डवर, तर २३ लाख ४३ हजार ५५५ लोकांना हे धान्य दिले जात होते.