

कोल्हापूर/कागल : शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करत राज्य शासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी दिली आहे. लवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज आणि थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. कागल नगरपरिषदेतर्फे राजर्षी शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, कागलनगरीची ज्ञानदायिनी हिंदुराव घाटगे विद्यामंदिर शाळेचा जीर्णोद्धार, लोकार्पण सोहळा व शेतकरी मेळावा झाला. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा घोंगडी, ऊस देऊन पारंपरिक पद्धतीने सत्कार केला.
फडणवीस म्हणाले, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्रांतीचे जनक शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण ही समाधानाची बाब आहे. समाजातील विषमता दूर करून बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केले. डॉ. आंबेडकर यांचे संविधान, शिवरायांचा वारसा आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांवर महायुती सरकार चालत आहे. देशातील सर्वात मोठी कर्जमाफी दिली असून याचा ५६ लाख शेतकऱ्यांना फायदा झाल्याचे सांगत फडणवीस म्हणाले, सरकारने वीज बिलाचे २५ हजार कोटी रुपये महावितरण दिले. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौर कृषी वाहिनी योजनेस गती दिली असून पुढील वर्षी १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, कागल ही शेतकऱ्यांचे कल्याण करणाऱ्या शाहू महाराजांची भूमी आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी शेतकरी हितासाठी केलेले कार्य आधुनिक काळातही प्रेरणादायी आहे. दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना आधार देत राधानगरीसारखे धरण दूरदृष्टी ठेवून उभारले आणि शेतीला पिढ्यान् पिढ्या समृद्ध बनवले. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवण काढताच त्यांना अश्रू अनावरण झाले. ते म्हणाले, राज्य सरकारने शेतकऱ्यांचे वीज व इतर प्रश्न मार्गी लावले आहेत. त्याकाळी शाहू महाराज यांच्याकडे पैसा असता, तर राधानगरी धरण ७० टीएमसी व काळम्मावाडी धरण १०० टीएमसीचे झाले असते. कृष्णा लवाद तंटा करण्याची गरजच भासली नसती.
शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांना सक्षम करणे महत्त्वाचे आहे. कर्जमाफी कायमस्वरूपी उपाय नाही. शेतकऱ्यांनी उत्पादनातूनच कर्ज फेडण्याइतके सक्षम झाले पाहिजे, हा सरकारचा दृष्टिकोन आहे. नगराध्यक्ष सविता माने यांनी प्रास्ताविक केले. उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांनी आभार मानले. यावेळी खा. शाहू महाराज, खा. धनंजय महाडिक, विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, महापौर रूपाराणी निकम, जि. प. अध्यक्षा शिल्पा खोत, आ. विनय कोरे, आ. अशोकराव माने, आ. राहुल आवाडे, माजी खा. संजय मंडलिक, माजी आ. संजय घाटगे, गोकुळचे माजी अध्यक्ष नवीद मुश्रीफ, गोकुळचे संचालक भैया माने, मुख्याधिकारी अजय पाटणकर आदी उपस्थित होते.
कागलमध्ये शाहूसृष्टी उभारण्यास निधी द्या
अजित पवार यांनी बारामतीत उभारलेल्या शिवसृष्टीच्या धर्तीवर कागलमध्ये शाहूसृष्टी उभारण्याचे नियोजन आहे. त्याचा प्लॅन तयार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी घाटगे यांनी केली.
मुख्यमंत्र्यांकडून ‘नांदा सौख्य भरे’ अशा शुभेच्छा
व्यासपीठावर हसन मुश्रीफ, समरजितसिंह घाटगे, संजय मंडलिक व संजय घाटगे एकत्रित दिसत आहेत, ही फक्त युती नाही तर महायुती आहे. नेत्यांनी ठरवले तर किती चांगल्या पद्धतीने कामे व राजकारण करता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे. या सर्वांना मी फक्त ‘नांदा सौख्यभरे’ असे म्हणेन, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.