गांधीनगर : जादा परताव्याच्या आमिषाने सव्वा कोटीला गंडा

जादा परताव्याचे आमिष; सहाजणांवर गुन्हा दाखल
Fraud with the lure of extra returns
जादा परताव्याचे आमिष दाखवत सव्वा कोटी रुपयांना गंडाFile Photo

गांधीनगर : पाच गुंतवणूकदारांना फॉरेक्स शेअर मार्केटमध्ये अमाप पैसे कमावल्याची बतावणी करून उचगाव (ता. करवीर) येथील ब्राईट बुल ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी प्रा. लि. येथे ट्रेनिंग देऊन जादा परताव्याचे आमिष दाखवत सव्वा कोटी रुपयांना गंडा घालणार्‍या सहाजणांवर गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

आकाश शिवाजी कांबळे, सुभाष शिवाजी कांबळे, शिवाजी पांडुरंग कांबळे (तिघेही रा. वाकरे, ता. करवीर), सयाजी जिन्नाप्पा भोसले, रोहन जिन्नाप्पा भोसले, शिवाजी जिन्नाप्पा भोसले (तिघे रा. वळिवडे, ता. करवीर.) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. यापैकी आकाश कांबळे व शिवाजी कांबळे फरार झाले असून अन्य चौघांना अटक केली आहे. फॉरेक्स शेअर मार्केट ट्रेडिंग करत असल्याचे सांगत संशयितांनी उचगाव येथील ब्राईट बूल ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. कंपनीमध्ये फसगत झालेल्या पाचजणांसह काही णांना शेअर मार्केटचे ट्रेनिंग दिले. या माध्यमातून अमाप पैसे कमावल्याची बतावणी करत महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे, परदेशात जाणे-येणे असा दिखावा करून ट्रेनिंगला आलेल्या लोकांना भुलवले. फिर्यादी रवींद्र यशवंत कामत ( रा. लक्षतीर्थ वसाहत, सुतारमळा, कोल्हापूर) यांना महिन्याला पाच ते सहा टक्के परतावा देऊ, असे आश्वासन संशयीतांनी दिले. तसेेच कामत, त्यांची पत्नी व इतर तीन जणांना या कंपनीमार्फत गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

कामत व त्याच्या पत्नीसह अन्य तिघा जणांकडून एक कोटी बारा लाख 97 हजार रुपयांची रक्कम गुंतवणुकीसाठी घेतली. जून 2022 ते जून 2024 अखेर कोणताही परतावा अगर गुंतवलेली रक्कम या कंपनीकडून गुंतवणूकदारांना मिळाली नाही. वारंवार विचारणा करून हेलपाटे मारून काहीही उपयोग झाला नसल्याने फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. त्यानंतर कामत यांनी गांधीनगर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news