Radhanagari Dam | राधानगरी धरणाचे चार दरवाजे खुले

दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच; ४४ बंधारे पाण्‍याखाली : धरण क्षेत्रांत मुसळधार
Radhanagari Dam |
Radhanagari Dam | राधानगरी धरणाचे चार दरवाजे खुले
Published on
Updated on

कोल्‍हापूर : गेल्‍या दोन दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू असून, सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाचे चार दरवाजे खुले झाले आहेत. चार दरवाजांतून ५,७१२ व खासगी वीजगृहातून १,४०० असा एकूण ७,११२ क्युसेक विसर्ग भोगावती नदीपात्रात होत असून, नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. सकाळी दहा ते रात्री दहा या बारा तासात राजाराम बंधार्‍याची पाणी पातळी सुमारे एक फुटाने कमी झाली. रात्री दहा वाजता पाणी पातळी ३१ फूट १० इंच होती. ४४ बंधारे पाण्‍याखाली आहेत.

राजाराम बंधार्‍याची पाणी पातळी सोमवारी सकाळी दहा वाजता ३२ फूट ७ इंच होती. तर रात्री दहा वाजता पाणी पातळी ३१ फूट ७ इंचांवर आली. कधी हलक्‍या सरी तर कधी मुसळधार पाऊस असा पावसाचा खेळ सुरू होता. राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्‍याने नदीच्‍या पाणीपातळीत वाढ होत राहिली. धरण क्षेत्रात दिवसभर जोरदार पाऊस झाला. राधानगरी, पाटगाव आणि घटप्रभा धरण क्षेत्रांत अतिवृष्‍टी झाली. त्या‍मुळे धरणांच्‍या पाणी साठ्यात वाढ झाली. रात्री आठच्‍या आकडेवारीनुसार राधानगरी धरण शंभर टक्‍के भरले. तर काळम्‍मावाडी ७३ टक्‍क्‍यांवर आहे. राधानगरीसह लहान- मोठी आठ धरणे शंभर टक्‍के भरली आहेत.

राधानगरी १०० टक्‍के, तुळशी ८० टक्‍के, वारणा ८६ टक्‍के, दूधगंगा ७३ टक्‍के, कासारी ८५ टक्‍के, कडवी १०० टक्‍के, कुंभी ८३ टक्‍के, पाटगाव ७६ टक्‍के, चिकोत्रा ६२ टक्‍के, चित्री १०० टक्‍के, जंगमहट्टी १०० टक्‍के, घटप्रभा १०२ टक्‍के, जांबरे १०० टक्‍के, आंबेओहोळ ९८ टक्‍के, सर्फनाला ९९ टक्‍के, धामणी आणि कोदे लपा तलाव १०० टक्‍के भरला आहे.

पिरळ, पडळी पुलावर पाणी

भोगावती नदीवरील पडळी पुलावर पाणी आल्याने राऊतवाडी धबधब्याकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पडळी, कारिवडे, डिगस व इतर वाड्यांचा संपर्क तुटला आहे. पिरळ पुलावर पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली आहे.

नृसिंहवाडी-औरवाड जुना पूल पाण्याखाली

नृसिंहवाडी- औरवाडला जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेला असून, पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. दोन्ही बाजूस बॅरिकेडस्‌ लावून ग्रामस्थांसाठी वाहतूक बंद केली आहे. चालू वर्षात हा पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे.

नृसिंहवाडीचे दत्त मंदिर संपूर्ण पाण्याखाली

नृसिंहवाडी : कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर सोमवारी दुसऱ्यांदा संपूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. कृष्णेची पातळी ४६ फूट ५ इंचांवर आली असून, सोमवारी दिवसभरात संथ वाढ झाली आहे. मंदिरात पाणी आल्यापासून श्रींची उत्सवमूर्ती नारायणस्वामी मठात ठेवण्यात आली असून, सर्व पूजा तिथेच होत आहेत. मंदिर प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असून सर्व साहित्य सुरक्षितस्थळी स्थलांतरीत केले आहे. बॅरिकेडस्‌ लावून भाविकांना पाण्यात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी जवान तैनात ठेवण्यात असून, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

राधानगरी : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आहे. सोमवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात ११० मि.मी. पाऊस झाला, तर दिवसभरात ८८ मि.मी. पाऊस झाला असून, जूनपासून आजअखेर एकूण ३,२५४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news