

राधानगरी : नंदू गुरव
गेले दोन दिवस राधानगरी धरणाच्या पानलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचे चार स्वयंचालित दरवाजे खुळे झाले आहेत. या चार दरवाजातून 5712 व वीज गृहातून 1500 असा एकूण 7212 क्यूसेक्स विसर्ग भोगावती नदी पात्रात होत आहे. आज सकाळी 5 वा.51 मी.नी सहा क्रमांकाचा दरवाजा खुला झाला. त्यानंतर 9 वाजता सहा तर अकरा वाजता अनुक्रमे पाच व चार क्रमांकांचा असे चार दरवाजे खुले झाले आहेत.
मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे भोगावती नदीपात्रातील पाण्यात वाढ झाली आहे. दिवसभरात पावसाचा जोर असाच राहिल्यास धरणाचे आणखी दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठाच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात धरण क्षेत्रात 84 मिमी पाऊस झाला असून, जुनपासून आज अखेर 4624 मि.मी.इतका पाऊस झाला आहे. धरणात द.ल.घ.फु.8331.18 इतका पाणीसाठा असून पाणीपातळी - 347.34 फूट इतकी आहे.