Ganjimal Vandalism Case | गंजीमाळ तोडफोडप्रकरणी चौघांना अटक; ५ लाख रुपयांचे नुकसान

Ganjimal vandalism case |
Ganjimal Vandalism Case | गंजीमाळ तोडफोडप्रकरणी चौघांना अटक; ५ लाख रुपयांचे नुकसान
Published on
Updated on

कोल्‍हापूर : महाविद्यालयातील वादातून सोमवारी मध्यरात्री गंजीमाळ परिसरात २५ ते ३० वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन संशयितांसह सहा जणांना अटक केली. तोडफोडीत सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी संशयितांची धरपकड करण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकून, गुन्ह्यातील शस्त्र आणि दुचाकींची जप्ती सुरू केली.

आकाश संजय मासाळ (वय २९), संतोष देविदास मोटे (३१), अर्जुन नागेश डोलारे (२८), सौरभ शिवाजी पाटील (२३, रा. राजेंद्रनगर) अशी अटक केलेल्‍यांची नावे आहेत. बुधवारी सकाळी त्‍यांना न्यायालयात हजर केले असता, न्‍यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली. महाविद्यालयातील वादातून जवाहरनगर, सुभाषनगर येथील २० ते २२ जणांच्या टोळक्याने सोमवारी मध्यरात्री गंजीमाळ परिसरात सशस्त्र हल्ला करून सिद्धेश कांबळे याच्यावर एडक्याने जीवघेणा हल्ला केला. परिसरातील २० ते २५ वाहनांची तोडफोड करून प्रचंड दहशत माजवली. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करून दोन अल्‍पवयीन संशयितांसह सहा जणांना अटक केली आहे. इतर संशयितांची धरपकड करण्यासाठी पोलिसांनी जवाहरनगर, सुभाषनगर येथे छापे टाकले; मात्र हल्लेखोर मोबाईल बंद करून पसार झाले. दोन पथकांकडून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितले.

हल्‍लेखोरांकडून नुकसानभरपाई घ्‍या

वादाशी काही संबंध नसलेल्या नागरिकांच्या वाहनांची, घरांची तोडफोड करण्यात आली. हातावरचे पोट असणाऱ्या टेम्‍पो चालकांचे व्यवसाय दुसऱ्या दिवशी ठप्‍प झाले. अशा गुन्ह्यांमध्ये हल्लेखोरांकडून नुकसानभरपाईची रक्कम वसूल करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली. असे केल्यास पुन्‍हा असे कृत्य करण्याचे धाडस होणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news