Road Accidents Deaths | चार अपघातांत चौघांचा अंत

दोन महिलांसह मुलगी जखमी; मृत सांगशी, अतिवाड, डोणोली, पासार्डेचे
Road Accident Death
Road Accident Death pudhari photo
Published on
Updated on

कोल्‍हापूर : जिल्‍ह्यात शुक्रवारी चार ठिकाणी झालेल्‍या अपघातांत चौघांचा मृत्‍यू तर दोन महिलांसह लहान मुलगी जखमी झाली. गगनबावडा तहसील कार्यालयासमोर दुचाकी घसरून तरुणाचा जागीच अंत झाला. वाघबीळ घाटात अज्ञात वाहनाने दुचाकीला ठोकरल्याने दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली. आंबेवाडी (ता. चंदगड) येथील डंपरने धडक दिल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर कळे-म्हासुर्ली रस्त्यावर एसटी बस व दुचाकीच्‍या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात नेत असताना उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

गव्याच्या धडकेने अपघात झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गगनबावडा : गगनबावडा-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर गगनबावडा तहसील कार्यालयासमोर गुरुवारी (दि. १८) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल स्लीप होऊन झालेल्या भीषण अपघातात सांगशी येथील तरुण जागीच ठार झाला. संतोष मधुकर चव्हाण (वय ४२, रा. सांगशी, ता. गगनबावडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात मोटारसायकल घसरून झाल्याचा पंचनामा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, हा अपघात मोटारसायकलला गव्याने धडक दिल्यामुळेच झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, वन्यजीवाच्या हल्ल्याचा वस्तुस्थितीदर्शक पंचनामा केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला होता.

अतिवाडच्या तरुणाचा मृत्यू

चंदगड : आंबेवाडी (ता. चंदगड) येथील जलसंपदा विभागाच्या धरणाजवळच्या वळणावर डंपरने धडक दिल्याने दुचाकी चालक संपत हणमंत कणबरकर (वय २८, रा. अतिवाड, ता. जि. बेळगाव) याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत डंपर चालक वासुदेव कृष्णनंद आळवे (वय ३९, रा. कोनवाळ कट्टा, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) याच्यावर चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. संपत हा मंडप डेकोरेटर व इलेक्ट्रिशियनचे काम करतो. तो नवीन काम बघण्यासाठी पाटणे फाटा ते मोटणवाडी यादरम्यान प्रवास करत होता. याचवेळी सकाळी नऊनंतर समोरून दोडामार्ग येथून आलेल्या डंपरने धडक दिली. यात संपतचा जागीच मृत्यू झाला.

पत्नीचा जागीच अंत; पती जखमी

पोर्ले तर्फ ठाणे : कोल्हापूर- रत्नागिरी रोडवरील वाघबीळ घाटातील नलवडे बंगल्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला ठोकरल्याने दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली. वंदना आनंदा पाटील (५०, रा. डोणोली, ता. शाहूवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. दुचाकीस्वार आनंदा सहदेव पाटील (६०) हे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची करवीर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. डोणोलीचे दाम्पत्य त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नाला वरणगे पाडळी येथे निघाले होते.

नवलेवाडीजवळ दुचाकीस्‍वाराचा अंत; पत्‍नी, मुलगी गंभीर जखमी

कळे : कळे-म्हासुर्ली रस्त्यावरील नवलेवाडी - वाघुर्डे दरम्यानच्या वळणावर एसटी बस व मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या प्रकाश दिनकर पाटील (४०, रा. पासार्डे, ता. करवीर) याचा रुग्णालयात नेत असताना उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर पत्नी व मुलगी या दोघी गंभीर जखमी झाल्या. हा अपघात सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. प्रकाश पाटील हे पत्नी अश्विनी व मुलगी स्वरा यांना घेऊन मोटारसायकलवरून सासरवाडी सुळे (ता. पन्हाळा) येथे निघाले होते. याचवेळी बावेली-रंकाळा ही एसटी बस घेऊन चालक गजानन श्रीपती काळे (वय ४५, रा. मल्हारपेठ, ता. पन्हाळा) कोल्हापूरला निघाले होते. वाघुर्डे-नवलेवाडी दरम्यानच्या वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. प्रकाश यांच्या डोक्यास जोराचा मार बसला. पत्नी अश्विनी यांच्याही डोक्यास मोठी दुखापत होऊन त्या बेशुद्ध पडल्या. तर मुलगी स्वरा हिच्या पायास मोठी दुखापत झाली आहे. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात नेत असताना वाटेतच प्रकाश यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news