

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आता इनकमिंग सुरू केले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ गटाच्या कारभार्यांसह काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांनी व जनसुराज्य शक्ती पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी मुबंईत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
यामध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पवार, राष्ट्रवादीचे उत्तम कोराणे, जनसुराज्य शक्तीकडून विधानसभा लढविलेले संताजी घोरपडे यांच्यासह 16 कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मुंबईत भाजप मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापुरातील काँग्रेसच्या माजी नगरसेविका सरस्वती पवार, माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांचे नातू अभिषेक बोंद्रे, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव यांच्यासह रिक्षा संघटनेचे नेते राजेंद्र थोरवडे, वैभव राजेभोसले, सुशांत सावंत, अभिजित माने, दीपक खांडेकर, मंदार राऊत, संकेत रूद्र, विलास इंदप, देवेश कुबल, सुदर्शन वोरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी, पक्षाची ध्येयधोरणे समजून घ्या, जनहिताच्या कामात अग्रेसर राहा, असे आवाहन केले. भाजपमध्ये प्रवेश करणार्यांची संख्या वाढत असली तरी कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. खासदार महाडिक यांनी कोल्हापुरातील अजून काही कार्यकर्ते भाजपमध्ये येणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी नगरसेवक जयंत पाटील, मुरलीधर जाधव, विश्वराज महाडिक उपस्थित होते.