Shivaji University Convocation | विकसित भारत घडविण्याची जबाबदारी तरुण पिढीवर

शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात माजी लष्करप्रमुख जे. जे. सिंग यांचे प्रतिपादन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ६३ व्या दीक्षान्त समारंभात राष्ट्रपती सुवर्णपदक तनुजा साळोखे, कुलपती सुवर्णपदक वेदिका कदम यांना प्रदान करताना राज्यपाल जिष्णू देव वर्मा. समवेत माजी लष्करप्रमुख जे. जे. सिंग, कुलगुरू डॉ. आर. के. कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. अजितसिंह जाधव.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ६३ व्या दीक्षान्त समारंभात राष्ट्रपती सुवर्णपदक तनुजा साळोखे, कुलपती सुवर्णपदक वेदिका कदम यांना प्रदान करताना राज्यपाल जिष्णू देव वर्मा. समवेत माजी लष्करप्रमुख जे. जे. सिंग, कुलगुरू डॉ. आर. के. कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. अजितसिंह जाधव. (छाया : पप्पू अत्तार)
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : भारताला २०४७ पर्यंत विकसित, आत्मनिर्भर व जागतिक स्तरावर सन्मानाचे स्थान मिळवून देण्याची मोठी जबाबदारी तरुण पिढीवर आहे. केवळ पदवी मिळविणे पुरेसे नसून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील समस्या सोडविण्यासाठी केला पाहिजे. नैतिक मूल्ये, कौशल्याच्या जोरावर विकसित भारताच्या उभारणीत तरुणांनी योगदान द्यावे, असे आवाहन माजी लष्करप्रमुख जे. जे. सिंग यांनी विद्यार्थांना केले.

शिवाजी विद्यापीठाच्या ६३ व्या दीक्षान्त समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले, २०४७ मध्ये भारताने विकसित राष्ट्र म्हणून उभे राहण्याचे ध्येय निश्चित केले आहे. पुढील दोन दशकांत तरुणांनी घेतलेले निर्णय २०४७ मधील भारताचे स्वरूप निश्चित करतील. विकसित भारताची उभारणी केवळ महानगरांतील उंच इमारतींमधून होणार नाही, तर द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरे, ग्रामीण उद्योग, शाश्वत शेती, स्वच्छ पाणी, परवडणाऱ्या आरोग्यसेवा व स्थानिक नवउद्योग यांच्या माध्यमातून ती साकार होईल. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या जिल्ह्यातील, राज्य व देशातील समस्या सोडविण्यासाठी करावा.

पदवीधर तरुणींनी कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे यावे. संशोधकांनी आपले संशोधन केवळ शैक्षणिक नियतकालिकांपुरते मर्यादित न ठेवता त्याचा उपयोग सामान्य माणसांचे जीवन अधिक चांगले करण्यासाठी करावा. व्यावसायिक जीवनात शॉर्टकट व तत्त्वांशी तडजोड करण्याचे प्रसंग येतील; मात्र अशावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नैतिक मूल्यांचे स्मरण ठेवावे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचा लौकिक वाढवावा

कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांनी अहवाल वाचन केले. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे ‘ज्ञानमेवामृतम्’ हे ब्रीद आचरणात आणत विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा उपयोग समाज आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी करावा. कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल क्रांतीच्या युगात तंत्रज्ञानाचे सुजाण वापरकर्ते बनण्यासोबत मानवी मूल्ये जपावीत. पदवी हा शिक्षणाचा शेवट नसून नव्या ज्ञानप्रवासाची सुरुवात आहे. प्रामाणिकपणा, नैतिकता, चिकित्सक विचार आणि सर्जनशीलतेच्या बळावर विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचा लौकिक वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी पदवी, पदविका प्रमाणपत्रांची माहिती सादर केली. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. यावेळी राज्यपाल कार्यालयाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, भैया माने, प्रतापसिंह पाटील आदी उपस्थित होते.

तरुणाईकडे तीन महत्त्वपूर्ण जमेच्या बाजू

आजची पिढी सर्वाधिक जोडलेली, गतिशील व जागतिक स्तरावर संधी मिळविण्यास सक्षम आहे. जगभरातील ज्ञान आणि माहिती क्षणार्धात उपलब्ध होत असल्याने तरुणांनी त्याचा योग्य उपयोग करावा. लोकसंख्यात्मक लाभांश हा आपोआप मिळणारा लाभ नसून, त्यासाठी कौशल्ये, गुणवत्ता आणि संधींची आवश्यकता आहे, असेही जे. जे. सिंग म्हणाले.

शिवरायांच्या विचारांमुळेच लष्करप्रमुख होण्याचा बहुमान

कोल्हापुरात येणे हा ऐतिहासिक क्षण आहे. कारण, मी मराठा लाईट इन्फंट्री व भारतीय सैन्यदलात ४० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली. या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, आदर्श यांचा सदैव आदर करीत प्रेरणा घेतली. त्यामुळेच भारतीय लष्करप्रमुखपदापर्यंत पोहोचण्याचा व पहिला मराठा लष्करप्रमुख होण्याचा बहुमान मिळाला, असे गौरवोद्‌गार जे. जे. सिंग यांनी काढले.

उच्च शिक्षणातील महिलांचा वाढता सहभाग सकारात्मक बाब

उच्च शिक्षणातील महिलांचा वाढता सहभाग ही सकारात्मक बाब आहे. मात्र, आर्थिक, सामाजिक व भौगोलिक अडथळ्यांमुळे कोणताही गुणवंत विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. वंचित घटकांतील विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील सहभाग वाढविण्यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.