

कोल्हापूर : रणरणत्या उन्हाच्या प्रचंड उकाड्यामुळे माणसासोबतच मुके पशु-पक्षी आणि वन्य प्राण्यांचेही प्रचंड हाल होत आहेत. यावर उपाय-योजना म्हणून वन विभागातर्फे जंगल क्षेत्रात कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे पाण्याच्या शोधासाठी प्राण्यांची होणारी भटकंती कमी झाली असून कृत्रिम पाणवठ्यांवर त्यांची तहान भागत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. पाणवठ्यांवर लावण्यात आलेल्या सुमारे 250 कॅमेर्यांमध्ये पाण्यासाठी आलेले गवे, सांबर, भेकर यासारखे प्राणी चित्रित झाले आहेत.
उन्हाळ्यात जंगल व डोंगर परिसरात वन्यप्राण्यांना चारा, पाणी मिळत नाही. अन्न व पाण्याच्या शोधात वन्यप्राणी सैरभैर होऊ लागतात. अनेकदा डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारासह गावांमध्ये धुमाकूळ घालतात. हत्ती, गव्यांच्या कळपासह वाघ व बिबट्याचा यात समावेश असतो. यामुळे वन्य प्राण्यांकडून ऊस, बटाटा, रताळी यासह विविध शेती उत्पादनांचे नुकसान होते. इतकेच नव्हे, तर कोंबड्या, शेळ्या-बकरी, गायी-म्हशी, कुत्री यासह माणसांवरही हल्ल्याचे प्रकार होतात. यामुळे वन्यजीव व मानवांतील संघर्ष सुरूच राहतो.
याच बरोबर वाहतुकीच्या रस्त्यांवर प्राणी आल्याने होणार्या अपघातात त्यांचा नाहक बळी जातो. या सर्वांवर उपाय-योजना म्हणून कृत्रिम वनतळ्यांची योजना प्रभावी ठरत आहे. याच बरोबर जंगल क्षेत्रात जनवारांच्या भुकेसाठी हत्ती गवत, ऊस, केळी, वड यांच्या लागवडीचेही प्रयोग राबविले जात आहेत.
वन विभागातर्फे जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील वनपरिक्षेत्रात 702 वनराई बंधार्यांची निर्मिती श्रमदानातून केली आहे. यात कडगाव 98, गारगोटी 71, पाटणे 42, चंदगड 21, राधानगरी 29, आजरा 75, मलकापूर 68, पन्हाळा 66, पेंडाखळे 119, गगनबावडा 63, करवीरमधील 50 बंधार्यांचा समावेश आहे.
याच बरोबर पावळ्यात वाहून जाणार्या पाण्याची साठवणूक व्हावी, या उद्देशाने 239 नैसर्गिक पाठवण्यांची साफसफाई व डागडुजी करण्यात आली आहे. यात कडगाव 34, गारगोटी 18, पाटणे 16, चंदगड 27, राधानगरी 14, आजरा 31, मलकापूर 27, पन्हाळा 25, पेंडाखळे 21, गगनबावडा 24, करवीर 2 यांचा समावेश आहे.
वन विभागातर्फे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील सुंडी, महिपाळगड, देवरवाडी, बसुर्ते, उचगाव, बेकिनकेरे, अतिवाड डोंगर पायथ्याशी पाणवठे निर्माण केले आहेत. यामुळे सीमा हद्दीतील डोंगर परिसरातील गवे, भेकर, ससे, साळिंदर, तरस, जंगली डुक्कर, मोर आणि इतर पशु-पक्षी या पाणवठ्यात पाणी पीत आहेत. यात पक्ष्यांची संख्या मोठी आहे. चार दिवसांतून एकदा या कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी सोडले जाते. यामुळे सीमाभागाच्या हद्दीतील डोंगर क्षेत्रात सद्यस्थितीत 25 ते 30 गव्यांचा कळप स्थिरावला आहे.