

कोल्हापूर : ‘जगात भारी ...आम्ही कोल्हापुरी’ हे वाक्य जगात गाजतं ते कोल्हापूरकरांच्या रांगडेपणामुळे. कोल्हापूरचा दिलदारपणा, कर्तृत्वशील युवा पिढी, इथलं आदरातिथ्य, माणुसकी यांनी जगाला तर प्रेमात पाडलं आहेच; पण त्याचबरोबर अस्सल कोल्हापूरकर तरुणांवर गेल्या काही वर्षात परदेशातील तरुणीही भाळल्या आहेत. सातासमुद्रापार अंतर पार करत फॉरेनच्या युवतींनी कोल्हापूरच्या मुलांना जोडीदार म्हणून निवडले आहे. या फॉरेनच्या लेकी कोल्हापूरच्या सुना झाल्या असून कोल्हापुरी संस्कृती आणि परंपरांनाही त्यांनी मनापासून स्वीकारले आहे.
विशेष म्हणजे, वेगळ्या संस्कृतीतील विवाह पद्धतींचा आदर करत दोन देशातील तरुण-तरुणींनी रेशीम गाठ बांधत सामंजस्याचेही उदाहरण दिले आहे. लग्नापूर्वीच्या प्रथा, परंपरांची माहिती करून घेण्यासाठी त्यांच्यामध्ये उत्सुकता असलेली पाहायला मिळते. दोन वेगळ्या देशातील तरुण- तरुणी लग्नासाठी एकत्र येताना क्षणिक चर्चेचा विषय न राहता त्यांनी आपलं नातं घट्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न देखील कौतुकास्पद आहेत. कोल्हापुरातील अनेक कुटुंबातील अशा भिन्न संस्कृतीमधील जोडपी सुखाने संसार करत आहेत.
कोल्हापूर हे शहर आणि ग्रामीण बाज ठेवून विकसित होत असलेले शहर आहे. अजूनही या शहरामध्ये जुन्या पद्धतीने राहणारे लोक आहेत. नव्या पिढीने देश- परदेशात शिक्षण घेतले आणि आताची तरुणाई पाश्चात्त्य देशांत नोकरीच्या निमित्ताने गेली आहे. मात्र, इथल्या तरुणांचे रांगडेपण, मैत्री, जिव्हाळा अन् आपुलकी फॉरेनच्या तरुणांना भावते आहे. मैत्रीचे रूपांतर प्रेमात अन् प्रेमाचं रूपांतर थेट लग्नात झाले आहे.
एकीकडे लाखो रुपये खर्चून होणारे विवाह, तर दुसरीकडे खर्चाला फाटा देऊन फॉरेनवरून कोल्हापुरात येऊन 10 जणांनी भारतीय संस्कृतीनुसार विवाहाची रेशीम गाठ बांधली आहे. 2021 ते 2024 या चार वर्षांतील हे विवाह आहेत. लग्न समारंभातील अनाठायी खर्चाची बचत व्हावी म्हणून काही कुटुंबे समोपचाराने ‘रजिस्टर मॅरेज’ करत आहे. यात स्विझर्लंड, अमेरिका, जेक्स , ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, लाओस, फिलिपिन्ससह अन्य देशांतील या लेकी कोल्हापूरच्या सुना म्हणून सुखनैव नांदत आहेत.
कोल्हापुरी मिसळ, तांबडा- पांढरा रस्सा कोल्हापूरकरांचा श्वास आहे. फॉरेनच्या लेकींनादेखील या दोन्ही खाद्यपदार्थांनी भुरळ घातली आहे. कोल्हापुरात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना या दोन पदार्थांचा बेत आखावाच लागतो. चमचमीत आणि झणझणीत मिसळ, तांबडा-पांढरा रस्स्याचा भुरका मारल्याशिवाय फॉरेनच्या लेकींच्या जिभेची तलफ भागत नाही, असे अनेक गमतीशीर किस्से त्यांच्या कुटुंबीयांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.