

कोल्हापूर : महाविकास आघाडीकडे सत्ता नाही; मग ते कोल्हापूरला निधी कुठून देणार, असा सवाल करीत महायुतीचा महापौर करून कोल्हापूरच्या विकासाची सुरुवात करा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. मिरजकर तिकटी येथे शनिवारी झालेल्या महायुती उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
चव्हाण म्हणाले, कोल्हापूरवर वर्षानुवर्षे अन्याय झाला आहे. यामध्ये बदल करून महायुतीच्या माध्यमातून कोल्हापूरचा विकास करण्याची संधी आली आहे. विरोधकांच्या भूलथापा आणि भावनिक आवाहनास बळी न पडता महायुतीची सत्ता आणावी. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्याने कोल्हापुरात सुविधा पूर्ण करण्यास महायुतीचा महापौर होणे गरजेचे आहे, महायुतीच्या घटकपक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी समन्वय ठेवून प्रत्येक बूथवर 50 टक्के जास्त मते मिळविण्याचे नियोजन करावे. महाविकास आघाडीने भ्रष्टाचार केल्याचे सर्वांना माहीत आहे.
चव्हाण म्हणाले, भावी पिढीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी महायुतीची सत्ता येणे महत्त्वाचे आहे. 25 वर्षे टिकतील असे सिमेंटचे रस्ते कोल्हापुरात बनवण्याचे मुख्यमंत्र्यांचे शब्द आहेत. विधानसभेला 10-0 निकाल देऊन सर्व आमदार महायुतीचे दिले आहेत. तसेच, महापौरही महायुतीचा करून कोल्हापूरच्या विकासाची सुरुवात करूया. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, निवडणुका आल्या की विरोधकांना विकास आठवतो. इतकी वर्षे झोपा काढत होता काय? 1972 पासून महापालिकेवर आमदार सतेज पाटील यांच्या काँग्रेस व आघाडीची सत्ता होती. भाजपची कधीही सत्ता नव्हती. आता विकासावर बोलणार्यांनी त्या काळात कोल्हापूरचा विकास का केला नाही. रस्ते, पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधाही देऊ शकले नाहीत. भाजपने भौतिक विकासाबरोबरच माणसांचा विकास केला. देशाची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर आणली.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने शहरातील रंकाळा संवर्धन व सुशोभीकरण, विमानतळ, रेल्वे स्टेशन आदीसाठी भरघोस निधी दिला आहे. 230 कोटींचे कन्व्हेंशन सेंटरही होत आहे. आय.टी. पार्क अंतिम टप्प्यात आहे. पूर नियंत्रणासाठी 3 हजार 800 कोटी मंजूर झाले आहेत. राज्यात फक्त कोल्हापुरात महायुती झाली, हे चांगले संकेत आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांनी महायुतीला भरघोस मतांनी विजयी करावे, त्यानंतर कोल्हापूर हद्दवाढीचाही प्रश्न सुटेल.
काँग्रेसच्या कालावधीत 1998 मध्ये कोल्हापूरचा डीपी मंजूर झाला. त्यावेळी शहरातील काँग्रेस नेत्यांनी कॉलेज, हॉस्पिटल करून स्वतःचा फायदा करून घेतला. महापालिकेच्या जागांचा ढपला पाडला. विरोधक फेक नरेटिव्ह सेटर आहेत. त्यांच्या भूलथापांना आता जनता बळी पडणार नाही, असेही आ. क्षीरसागर यांनी सांगितले.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन झाले आहे. 1,400 कोटींचा अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा मंजूर झाला आहे. आयटी पार्क होत आहे. त्यामुळे महायुती राजकारण करत नाही, तर विकासकारण करते. देशातील सर्वोत्तम शहर बनविण्यासाठी महायुतीच्या हातात सत्ता द्या. भविष्यातील पन्नास वर्षांच्या विकासाचा अजेंडा राबवू, असे आवाहनही आबिटकर यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले. अशोक देसाई यांनी आभार मानले.