15 to 20 tons food waste | दररोज 15 ते 20 टन अन्नाचा होतोय ‘कचरा’!

शहरात एकीकडे हजारो ‘भुकेकंगाल’ तर दुसरीकडे अन्नाची अमाप नासाडी : विचार करण्याची गरज
15 to 20 tons food waste
15 to 20 tons food waste | दररोज 15 ते 20 टन अन्नाचा होतोय ‘कचरा’!
Published on
Updated on

सुनील कदम

कोल्हापूर : द़ृश्य पहिले : शहरातील झोपडपट्ट्या, फुटपाथ, उद्याने, एवढेच काय; पण स्मशानभूमीत जरी फेरफटका मारला, तरी उपाशी किंवा अर्धपोटी लोकांचा, गोरगरीब लोकांचा घासभर अन्नासाठी चाललेला आटापिटा, माणसांचा आणि जनावरांचा जीवघेणा संघर्ष बघायला मिळतो.

द़ृश्य दुसरे : दिवसा आणि रात्रीच्या जेवणावेळी शहरातील हॉटेल्समध्ये ‘खरकटे’ म्हणून टाकून दिलेल्या अन्नाचे ट्रकच्या ट्रक भल्या सकाळी भरभरून कचरा डेपोकडे धावताना दिसतात. हे दररोज नित्यनेमाने दिसणारे द़ृश्य आहे. एकीकडे भुकेमुळे अनेकांच्या पोटात पडलेला खड्डा तर दुसरीकडे कचरा कोंडाळ्याकडे निघालेले अन्नाचे ढीगच्या ढीग, या दोन द़ृश्यांमधील विरोधाभास कोणत्याही सहृदयी माणसाच्या मनाला विषण्ण केल्याशिवाय राहात नाही. शहरात दररोज पंधरा ते वीस टन अन्न कचरा कोंडाळ्यात टाकले जात असल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे.

कोल्हापुरी खासियत!

कोल्हापुरी पद्धतीचे झणझणीत मटण-चिकन, तांबडा-पांढरा रस्सा आणि अस्सल कोल्हापुरी पद्धतीचे शुद्ध शाकाहारी जेवण हे कोल्हापूरचे वैशिष्ट्य आहे. महालक्ष्मी आणि जोतिबाच्या दर्शनाच्या निमित्ताने देशभरातून दररोज हजारो भाविक कोल्हापुरात येत असतात. देवदर्शन आटोपल्यानंतर या मंडळींनी कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेतला नाही, असे सहसा होत नाही. याशिवाय खास कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी म्हणून कोल्हापुरात येणार्‍यांची संख्याही हजारोंच्या घरात आहे.

शेकडो हॉटेल्स-खाणावळी!

कोल्हापूर शहरात तब्बल 370 हून अधिक हॉटेल्स आहेत. या हॉटेल्सशिवाय खास कोल्हापुरी जेवणासाठी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शंभर-दीडशे खानावळीही आहेत. ही हॉटेल्स आणि या खाणावळींमधून दररोज एक ते दीड लाखाहून अधिक लोक खास कोल्हापुरी पद्धतीच्या मांसाहारी आणि शाकाहारी जेवणावर ताव मारतात. कोल्हापूरच्या द़ृष्टीने ही निश्चितच अभिमानाची बाब आहे आणि ती तशी असायलाही हवी.

अन्नाचा कचरा!

मात्र दिवस उगवला की, खवय्यांच्या या गर्दीचा दुसरा अंक बघायला मिळतो. महापालिकेतील आरोग्य विभागाच्या काही गाड्या हॉटेल्समधील ‘कचरा’ गोळा करायला बाहेर पडतात. काय असतो हा ‘कचरा’? अर्धवट टाकून दिलेल्या चपात्यांच्या राशी, शिल्लक राहिलेले भातांचे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या बिर्याणीचे ढीग, ग्राहकांनी शिल्लक ठेवून दिलेल्या मटणाचे आणि चिकनचे ढिगारे, ग्राहकांनी अर्धवट टाकून दिलेल्या तळलेल्या माशांच्या राशी, शाकाहारी पद्धतीच्या वेगवेगळ्या भाज्या-पावभाज्या, कांदा-लिंबू, मुळा, बीट आणि गाजराचे तुकडे यासह लोक जे जे काही म्हणून खातात, ते सारे प्रकार या कचर्‍यात बघायला मिळतात. हा जो काही ‘कचरा’ गोळा केला जातो, तो जवळपास दहा ते पंधरा टनांच्या आसपास असतो. अन्य छोट्या-मोठ्या हॉटेल्स-हातगाड्यांमधूनही अन्नाचा तेवढाच म्हणजे सात ते आठ टन ‘कचरा’ थेट कचरा कोंडाळ्यात टाकला जातो. म्हणजे दिवसाकाठी पंधरा ते वीस टन अन्नाचा चक्क ‘कचरा’ होतो!

आज याच कोल्हापूर शहरातील अनेकजण एकवेळच्या अन्नालाही महाग आहेत. भुकेपोटी भीक मागणार्‍यांची संख्याही काही कमी नाही. गोरगरिबांच्या वस्त्यांमधून कोंड्याचा मांडा करून गुजराण सुरू आहे. भुकेल्या पोटी कचरा कोंडाळ्यात अन्नाचा ठाव घेणारे जीवही ठायी ठायी बघायला मिळतात. त्यामुळेच भरल्यापोटी ‘अन्नाचा कचरा’ करणार्‍या खवय्यांना सांगावेसे वाटते की, बाबांनो, हवे तेवढे खा; पण ‘हवे तेवढेच खा’ आणि अन्नाचा हा असा कचरा करू नका!

30 ते 40 हजार लोकांच्या तोंडचा घास..!

सर्वसाधारणपणे माणसाला एकावेळी 500 ग्रॅम अन्नाची आवश्यकता असते. त्या हिशेबाने कोल्हापूर शहरातील हॉटेल्समधून दिवसाकाठी जे पंधरा-वीस टन अन्नकचरा म्हणून कचरा कोंडाळ्यात टाकले जाते, त्यातून जवळपास 30 ते 40 हजार लोकांची भूक भागू शकते. गरिबीमुळे उपाशीपोटी राहावे लागत असलेल्या कुटुंबांना आणि त्यांच्या लेकरा-बाळांना या ‘कचर्‍यातून’ पोटभर खायला मिळू शकते, याचा कुणीतरी विचार करण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news