

कोल्हापूर : ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त ओसवाल परिवार, कोल्हापूर यांनी मंगळवारी भोजन वाटप केले. सीपीआर चौक येथे गेल्या पाच वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या कोल्हापूर थाळी येथे या उपक्रमाचे आयोजन केले होते. ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते भोजन वाटप करण्यात आले.
ओसवाल परिवार गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे. मंगळवारी दिवसभरात शेकडो नागरिकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. चपाती, भाजी, भात आणि शिरा याचा भोजनामध्ये समावेश होता. दुपारी 12.30 ते 2 पर्यंत भोजन वाटप सुरू होते.
यावेळी उद्योजक सुरेंद्र जैन, उद्योजक जयेश ओसवाल, शैलेश ओसवाल, वैभव ओसवाल, कोल्हापूर थाळीचे संयोजक उदय प्रभावळे यांच्यासह कोल्हापूर थाळीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.