‘अन्न-औषध’च्या कृपेने जिल्ह्यात भेसळीला उधाण!

सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ : उच्चस्तरीय कारवाईची आवश्यकता
Food and drug adulteration
‘अन्न-औषध’च्या कृपेने जिल्ह्यात भेसळीला उधाण!Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात खाद्यपदार्थांमधील भेसळीने थैमान मांडले असून भेसळीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ‘अन्न आणि औषध’ प्रशासनाच्या कृपेमुळे भेसळ बाजार जोमात आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आवश्यकता आहे.

एकीकडे जनता महागाईमुळे वैतागलेली आहे आणि दुसरीकडे भेसळीमुळे लोकांची दुहेरी लुबाडणूक सुरू आहे. धान्य, कडधान्य, डाळी, खाद्यतेल, मीठ, मिरची, मसाला, चटणी, चहा पावडर, गूळ, दूध, दही, ताक, तूप, लोणी, श्रीखंड, खवा, बर्फी, मिठाई, बहुतांश हॉटेलमधील चहा, नाष्टा, जेवण, शीतपेये आदी सर्व काही भेसळीने व्यापून गेलेले दिसत आहे. इतकेच काय, पण मिनरल वॉटरच्या नावाखाली पाण्यातही भेसळ होताना दिसत आहे. सर्वसामान्य माणसांना या भेसळीचे रोज नवे रूप बघायला मिळत आहे. पण डोळ्यावर ‘अर्थपूर्ण’ कातडे ओढून घेतलेल्या ‘अन्न-औषध’ प्रशासनाला याच्याशी काही देणे-घेणे असलेले दिसत नाही.

मराठवाड्याच्या काही भागात होणारा ‘बार्शी शाळू’ हा त्याच्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र आजकाल अनेक धान्य विक्रेत्यांनी बार्शी शाळूत अन्य शाळूची भेसळ करून किंवा कोणताही शाळू ज्वारी बार्शी शाळू म्हणून अव्वाच्या सव्वा दराने ग्राहकांच्या गळ्यात मारण्याचा सपाटा सुरू आहे. तुरीच्या डाळीमध्ये लाखी डाळीची भेसळ करून विकली जात आहे. साध्या तांदळाला सुगंधी रसायने चोपडून तो तांदूळ ‘बासमती राईस’ म्हणून विकला जात आहे. सर्वसामान्य ग्राहकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन हा सगळा भेसळ बाजार दिवसेंदिवस फोफावतच चालला आहे.

कोल्हापुरी चटणी आणि कोल्हापुरी मसाला त्याच्या खास चवीसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी चटणी आणि कोल्हापुरी मसाल्याचे अनेक परंपरागत आणि नामवंत विक्रेते इथे आहेत. पण या व्यवसायात शिरलेल्या काही मवाल्यांनी कोल्हापुरी चटणी आणि मसाल्याला गालबोट लावायला सुरुवात केली आहे. बाहेरगावाहून किंवा परराज्यातून कोल्हापुरात अंबाबाई दर्शनाला येणारे अनेक भाविक परत जाताना अगदी आठवणीने कोल्हापुरी चटणी-मसाला घेऊन जातात. पण लगेचच त्यांचा भ्रमनिरास होते. कोल्हापुरी चटणीत चक्क लाकडी भुसा, आरोग्यबाधक रंग यांचा वापर होताना दिसत आहे. मसाल्याच्या पदार्थांमध्ये तर कुठल्याही झाडाची पाने, साली, इतकेच काय; धोतर्‍याच्या बियांचाही वापर होताना दिसत आहे.

कोल्हापुरी गुळाची चव पार साता समुद्रापार पोहोचलेली आहे. मात्र या व्यवसायात शिरलेल्या काही भेसळासुरांमुळे कोल्हापुरी गुळावरचा विश्वासही हळूहळू उडताना दिसत आहे. खाद्यतेल आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ तर भयावह स्वरूपाची आहे. खाद्यतेल आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीने तर जणू काही नागरिकांच्या आरोग्याशी उभा दावाच मांडला आहे. कोल्हापुरी जेवणाची नजाकत आणि ख्याती काही भेसळासुरांमुळे पुरती बदनाम होत चालली आहे. असा एकही खाद्यपदार्थ किंवा पेय शिल्लक राहिलेले नाही की, ज्यात भेसळ नाही.

ऐन दिवाळीत भेसळीचा बाजार अजून जोमात!

दसरा-दिवाळीची चाहूल लागली की भेसळीच्या बाजाराला जणू काही उधाणच येते. या काळात प्रामुख्याने खाद्यतेलांसह दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, ड्राय फ्रूटस् यांची भेसळ जोमात असते. या भेसळीमुळे दरवर्षी दसरा-दिवाळी संपली की, वेगवेगळ्या आजारांच्या साथी सुरू झालेल्या दिसतात. मात्र या साथींचे अन्न व औषध प्रशासनाला कोणतेही सोयरसुतक असलेले दिसत नाही. कारण या विभागाच्या दृष्टीने हेच खरे ‘सुगीचे दिवस’ असतात!

* या सगळ्या भेसळीचा आणि ती करणार्‍या भेसळासुरांचा सगळा ‘सातबारा’ अन्न व औषध प्रशासनाला चांगलाच परिचित आहे. पण महिन्याकाठी जमा होणार्‍या लाखो रुपयांच्या मलईसाठी हा विभाग या जीवघेण्या भेसळीकडे अर्थपूर्ण कानाडोळा करताना दिसत आहे. त्यामुळे आता उच्चस्तरीय पातळीवरूनच ‘अन्न व औषध’सह एकूणच भेसळ बाजाराचा ‘पंचनामा करण्याची आवश्यकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news