Kolhapur Rain : ‘अलमट्टी’ची धास्ती, मान्सून वेळेआधी,जादा पर्जन्याची भीती, महापुराची वर्दी

जिल्ह्यातील नदी, नाले वळवामुळे तुडुंब; अलमट्टी धरणामुळे महापुराची टांगती तलवार कायम
Kolhapur Rain News
अलमट्टी धरणामुळे महापुराची टांगती तलवार कायम
Published on
Updated on
सुरेश पवार

कोल्हापूर ः ऐन वैशाख वणव्यात म्हणजे मे महिन्यात कोल्हापूरसह महाराष्ट्रात वळवाच्या धुवाँधार पावसाने धुमाकूळ घातला. शंभर वर्षांत पडला नाही, एवढा विक्रमी म्हणजे तिपटी-चौपटीपेक्षा अधिक पाऊस कोसळला. वळवाचा तडाखा सुरू असतानाच, कधी नव्हे तो मान्सूनचा पाऊस आधी अंदनामात, नंतर केरळात आणि आता महाराष्ट्रात नेहमीपेक्षा अधिक वेगाने दाखल झाला. नियमित वेळेपूर्वी 15 दिवस आधीच मोसमी पावसाचे आगमन झाले. कोल्हापूर जिल्ह्यातही वळीव आणि मान्सून पाठोपाठ आल्याने शेतीची तर वाताहत झाली; पण मे महिन्यात काही नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले. त्यातच यंदाचे पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक असल्याने, अलमट्टीच्या उंचीचीही धास्ती असल्याने यावर्षीही कोल्हापूर, सांगलीला महापुराचा तडाखा बसण्याची भीती निर्माण झाली आहे.

2005, 2019 आणि 2021 या तीन वर्षांत कोल्हापूर, सांगलीला महापुराने जबरदस्त तडाखा दिला. 2019 च्या महापुराने तर कोल्हापूर, सांगलीला वेठीला धरले आणि तब्बल दोन-तीन आठवडे जनजीवनावर गंभीर परिणाम झाला. 2005 मध्ये 26 जुलै रोजी पंचगंगेला महापूर आला आणि पाहता पाहता पंचगंगेची पातळी सुमारे 50 फुटांपर्यंत पोहोचली. 2019 मध्ये 2 ऑगस्टला महापूर आला आणि अवघ्या दोन दिवसांतच महापुराने रौद्र स्वरूप धारण केले. पंचगंगेची पातळी तब्बल 55.8 फुटांवर गेली. पुणे - कोल्हापूर महामार्ग पुरामुळे बंदच पडला. कोल्हापूरच्या तिन्ही बाजूला महापुराने वेढा घातला. सांगली शहरही बहुतांश जलमय झाले. 2021 यावर्षीही महापुराची तशीच पुनरावृत्ती झाली.

अलमट्टी धरणामुळे महापूर

2005 आणि 2019 मध्ये नेहमीपेक्षा दीडपट अधिक पाऊस पडला होता. मात्र, 2021 मध्ये पावसाचे प्रमाण 15 टक्के कमी होते आणि अलमट्टी धरणामुळेच महापुराची आपत्ती ओढवते, हे स्पष्ट झाले होते. सध्या अलमट्टीची जी उंची आहे, त्यामुळेच पुराचे पाणी पुढे जायला मार्ग राहत नाही आणि महापुराचे संकट कोहापूर-सांगलीवर कोसळते. आता तर अलमट्टीची उंची आणखी पाच मीटरने वाढविण्याचा चंगच कर्नाटक सरकारने बांधलेला आहे. त्यामुळे भविष्यात काय घडेल, याचा तर्क करणेही कठीण आहे.

‘राधानगरी’ आताच निम्मे भरले

यापूर्वी तीनवेळा जे महापुराचे संकट आले, तेव्हा राधानगरी धरण मे महिन्यामध्ये 20 ते 30 टक्केही भरलेले नव्हते. मे महिन्यातील अभूतपूर्व वळीव पावसामुळे जिल्ह्यातील तुळशी, कासारी, भोगावती आदी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. जिल्ह्यातील 15 बंधार्‍यांवर पाणी आले आहे. जूनअखेर, जुलैमध्ये पावसामुळे जशी स्थिती निर्माण होते, तशी काहीशी परिस्थिती आताच उद्भवली आहे. महत्त्वाचे म्हणजे, 27 मे रोजीच राधानगरी धरण निम्मे भरले आहे. राधानगरीतून होणारा पाण्याचा विसर्ग महापुराच्या द़ृष्टीने महत्त्वाचा ठरतो.

जादा पर्जन्यमानाचा अंदाज

वळवाने आधीच नद्या, नाले भरलेले असताना यंदा पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वळवाचा झंझावात वाढणारे पर्जन्यमान यांचा मेळ घातला आणि अलमट्टीच्या विद्यमान उंचीचा व निर्माण होणार्‍या बॅक वॉटरचा गंभीर प्रश्न लक्षात घेतला, तर यामुळे महापुराची अस्मानी आपत्ती ओढवण्याची भीती व्यक्त झाली तर आश्चर्य नाही.

राधानगरी पाणीसाठा

(क्षमता 8.36 टीएमसी)

तारीख पाणीसाठा टीएमसी

27/5/2025 4.49

27/5/2019 1.90

27/5/2021 2.96

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news