

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील नागरिकांचे महापुरामुळे होणारे नुकसान आता टळणार आहे. त्याकरिता महत्त्वाकांक्षी पूरनियंत्रण प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासह ब्ल्यू लाईनचाही विषय मार्गी लावू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. महायुतीच्य प्रभाग क्र.6 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवार पेठ येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
शहराचा विकास आणि सर्वसामान्य कोल्हापूरवासीयांना मूलभूत सोयी सुविधा देणे हेच महायुतीचे ध्येय असल्याचे सांगत आ. क्षीरसागर म्हणाले, गेल्या पाच वर्षांत महायुती सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात विकासाची गंगा प्रवाहित झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक जनहिताचे निर्णय घेतले जात आहेत. निवडणूक आली की, फक्त घोषणाबाजी न करता ती कामे पूर्ण करणे ही महायुतीची कार्यपद्धती आहे.
कोल्हापुरात 2019 आणि 2021 मध्ये महापुराने थैमान घातले. शहरातील हजारो नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यावेळी बचाव कार्यात सहभागी झालो. पूरग््रास्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करून दिलासा देण्याचे काम आम्ही केले आहे. महापुराची गंभीर परिस्थिती टाळावी यासाठी राज्य शासनाच्या मित्र संस्थेमार्फत कोल्हापूर, सांगली पूरनियंत्रण प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. येत्या काही वर्षांत पुराच्या पाण्याचा तातडीने निचरा होणे, पाणी दुष्काळग््रास्त भागाकडे वळविणे हा उद्देश आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात महापुरामुळे नागरिकांचे होणारे नुकसान टळणार आहे. महापुरामुळे शहरातील ब्ल्यू लाईनचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तोही मार्गी लावू, असेही त्यांनी सांगितले. यावेळी महायुतीचे उमेदवार सौ. शीला अशोक सोनुले, नंदकुमार मोरे, सौ. माधवी प्रकाश गवंडी, सौ. दीपा दीपक काटकर यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहनही आ. क्षीरसागर यांनी केले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, किशोर घाटगे, सनी अतिग््रेा, रियाज बागवान, उदय जगताप, विराज चिखलीकर, निरंजन खाडे, जयराज ओतारी, नाना आयरेकर, सुरेश सुतार आदी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.