

हातकणंगले : हातकणंगले येथील ओवी सागर पुजारी या चिमुकलीचा सबक्यूट स्क्लेरोसिंग पॅनेसेफलायटीस या दुर्मीळ आजाराने उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी मृत्यू झाला. सहा महिन्यांपासून ती या आजाराशी झुंज देत होती. तिच्या मृत्यूने हातकणंगले परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कोल्हापुरात ‘एसएसपीई’चा हा पहिला बळी ठरला आहे.
ओवीला सहा महिन्यांपूर्वी फिट आली होती. गावातच काही काळ उपचार केले; मात्र ही फिट वारंवार येऊ लागल्याने तिला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व तपासण्या केल्यानंतरही निदान लागत नव्हते. काही काळाने तिला दुर्मीळ एसएसपीई विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या आजारावर कोणतेच ठोस औषध उपलब्ध नसल्यामुळे वडील सागर पुजारी हतबल झाले होते; परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही. अनेक ठिकाणी आजाराच्या औषधाची विचारणा केल्यानंतर चीनमध्ये औषध उपलब्ध असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी थायलंड येथून औषध आणून उपचार सुरू केले. त्यानंतर काही प्रमाणात ओवीच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली; पण रविवारी दुपारी अचानक प्रकृती बिघडली व तिचा मृत्यू झाला.