Winter Season : आठवडाभरानंतर पारा घसरणार,थंडी येणार!

कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमान १४ ते १७ अंशांवर घसरणार
Kolhapur Winter Season
कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमान १४ ते १७ अंशांवर घसरणार
Published on: 
Updated on: 

आशिष शिंदे

कोल्हापूर : लक्ष्मीपूजनानंतर राज्यातील हवामानात लक्षणीय बदल होण्याचे संकेत आहेत. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात थंडीची पहिली लाट अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रातील दख्खनचा भाग आणि मराठवाड्यात किमान तापमान १४ ते १७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

९ नोव्हेंबरपासून गारव्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, १४ नोव्हेंबरपर्यंत तापमानात घट होऊ शकते. मात्र, ‘अल निनो’च्या प्रभावामुळे यंदा हुडहुडी भरविणाऱ्या थंडीचे दिवस कमी राहणार आहेत. कडाक्याच्या थंडीचा दीर्घ मुक्काम नसेल, तर अधूनमधून थंडीचे छोटे छोटे स्पेल अनुभवायला मिळतील. राज्यात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात येणारी थंडीची चाहूल टिकून राहीलच, असे नाही. ‘अल निनो’चा प्रभाव, वातावरणातील आर्द्रतेचे अधूनमधून होणारे प्रवाह आणि पूर्वेकडील वारे यामुळे तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची एक फेरी येण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. आर्द्रतेचे प्रवाह आणि वाऱ्यांच्या बदलत्या दिशेमुळे काही भागांत पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे नोव्हेंबरमधील हवामान केवळ थंडीपुरते मर्यादित न राहता उष्णता, गारवा आणि अवकाळी पाऊस अशा तिन्ही घटकांच्या प्रभावाखाली राहण्याची शक्यता आहे.

लक्ष्मीपूजनानंतर राज्यात थंडीची पहिली लाट येईल. कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रातील दख्खनचा भाग आणि मराठवाड्यात किमान तापमान १४ ते १७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते. ९ नोव्हेंबरपासून सुरू होणारा हा थंडीचा स्पेल १४ नोव्हेंबरपर्यंत अधिक तीव्र होण्याचे संकेत आहेत.
- अथ्रेय शेट्टी, हवामान तज्ज्ञ, मुंबई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.