

कोल्हापूर : क्रीडा संकुल परिसरातील फोटो लॅमिनेशन दुकानास बुधवारी (दि. १९) मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. प्लायवुड, लॅमिनेशन मशिनसह फोटो फ्रेमचे साहित्य आगीच्या भक्षस्थानी आल्यामुळे १० लाखांचे नुकसान झाले. दुकान मालक सचिन महादेव कदम (रा. सुभाषनगर) यांनी याबाबत वर्दी दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले.
मंगळवार पेठ येथील क्रीडा संकुल परिसरात सचिन कदम यांच्या मालकीचे श्री पंत कृपा लॅमिनेशन दुकान आहे. सचिन बुधवारी रात्री दुकान बंद करून घरी गेले होते. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास त्यांना परिसरातील नागरिकांनी दुकानास आग लागल्याचे सांगितले. दुकानातून आगीचे लोट बाहेर येताना स्थानिकांना दिसले. अवघ्या काही मिनिटातच टिंबर मार्केट येथील अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. यानंतर महापालिका, प्रतिभानगर येथीलही जवान दाखल झाले. त्यांनी एक तासाच्या अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळवले.
आगीचे कारण अस्पष्ट
कदम यांच्या दुकानातील वीज पुरवठा गेल्या चार दिवसांपासून खंडित करण्यात आला होता. यामुळे शॉर्ट सर्किटने आग लागण्याचा प्रश्नच येत नाही. मग नेमके आग कशामुळे लागली याचा शोध सुरू आहे.