

चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : ‘गोकुळ’ची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी होत असून पुढील वर्षी संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. निवडणुकीपूर्वी होणारी ही शेवटची सभा असल्याने ती गाजविण्याची तयारी दोन्ही बाजूंनी सुरू आहे. गोकुळवरील वर्चस्वासाठी होणारी ही अखेरची हातघाई असून यानंतरचा सामना हा थेट निवडणुकीच्या आखाड्यातच होणार आहे. त्यामुळे राजकारणाची पुढची दिशा ठरविणार्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील सत्तांतराने गोकुळचा मांडलेला संसार उद्ध्वस्त झाला. घर लहान पडू लगल्याने काहींना स्वतंत्र राहावे लागते तशी अवस्था गोकुळमध्ये सत्तांतर घडविण्यात सिंहाचा वाटा असलेल्यांची झाली. हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना सोबत घेऊन कारभार करण्याचा प्रयत्न केला; पण गोकुळमध्ये विरोधाची बाजू लावून धरलेल्या महाडिक गटाने त्यावर कठोर प्रहार केले. अरूण डोंगळे यांनी महायुतीचा अध्यक्ष होणार असेल तरच आपण आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ, अशी भूमिका घेताच राज्यपातळीवरून सूत्रे फिरली व गोकुळचा अध्यक्ष निवडण्याचे स्थानिक नेत्यांचे अधिकार राज्य पातळीवरील नेत्यांकडे गेले.
तडजोडीतून नाविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड झाली असली तरी कारभारावर महाडिक गटाचा आक्षेप कायम आहे. आजही त्यांनी तो कायम ठेवला आहे. गोकुळच्या वतीने दूध संस्थांना देण्यात येणारी जाजम व घड्याळ खरेदीचा मुद्दा सध्या गाजत आहे. ठाकरे शिवसेनेने तो लावून धरला आहे. या खरेदीची चौकशी करण्यासाठी दुग्ध विकास विभागाने चौकशी अधिकार्यांची नियुक्ती केली आहे. गोकुळ व्यवस्थापनाने मात्र ही खरेदी नियमाप्रमाणेच केली असल्याचे सांगितले आहे. आता चौकशी अहवालाची प्रतीक्षा असून मंगळवारच्या सभेत हा मुद्दा गाजणार आहे.
जाजम व घड्याळ खरेदीवर आक्षेप कायम ठेवत महाडिक गटाने 21 प्रश्न विचारले आहेत. शौमिका महाडिक यांनी गोकुळचे अध्यक्ष महायुतीचे असले तरी सत्ता कुणाची याबाबत संभ्रम कायम असल्याचे सांगून महाडिक गटाचा निशाणा स्पष्ट केला आहे.