

चंदगड : चंदगड वन परिक्षेत्रचे अधिकारी व हातकणंगलेतून आलेल्या 9 तसेच स्थानिक 2 असे 11 शिकारी यांच्यात सोमवारी मध्यरात्री फिल्मी स्टाईल थरार घडला. अडवलेल्या दोन कारची तपासणी करत असतानाच दहशत निर्माण करून दोन्ही कारचालकांनी कारसह धूम ठोकली. मात्र पाठलाग करत असतानाच एक कार शेतात घुसली. यादरम्यान मागून येणारी दुसरी कार दहशत निर्माण करत पुढे जाण्यात यशस्वी झाली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात यश आले.
अपघातग्रस्त कारमधील शिकारी उसाच्या शेतातून अंधारात पसार झाले. त्यांच्याकडे धारदार शस्त्रे आणि बंदूक असल्याने त्यांनी दहशत निर्माण केली. याच दरम्यान मागून येणाऱ्या दुसऱ्या एका प्रवासी कारमधील शिकारी पळून जाण्यात यशस्वी झाले. यात सहभागी असलेल्या
11 शिकाऱ्यांपैकी कानूर (ता. चंदगड) येथील 1, दानोळी व रुकडी (ता. हातकणंगले) येथील 2 अशा तीन शिकाऱ्यांना त्यांच्या गावातून अटक करण्यात आली, तर दानोळी येथील 6, माणगाववाडी (ता. हातकणंगले) व कानूर (ता. चंदगड) येथील प्रत्येकी 1 असे 8 शिकारी अद्यापही फरार आहेत.
घटनास्थळावरून अपघातग््रास्त कारमधील बंदुकीचे केस कव्हर, जिवंत काडतूस, विविध प्रकारचे सात सुरे, चाकू, अन्य धारदार हत्यारे व कार असा 5 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कानूर खुर्द (ता. चंदगड) येथून तुकाराम महादेव अमृसकर, दानोळी (ता. हातकणंगले) येथून रियाज दस्तगीर जमादार तर गंजीमाळ, रुकडी येथून अमीन रहीमबक्ष मुजावर या तिघांना त्यांच्या गावातून अटक करण्यात आली.
घटनास्थळावरून फरार झालेल्यामध्ये दिगंबर पांडुरंग अनगुडे (रा. कानूर खुर्द, चंदगड), लखन शिवाजी हेगडे (रा. माणगाववाडी, ता. हातकणंगले), अन्वर इबाहिम पटेल, इर्षाद नदाफ, बबलू नदाफ, दाऊद अजीज नदाफ, शाबबीर दस्तगीर जमादार, अक्षय हेगडे (सर्व रा. दानोळी, ता. हातकणंगले), लखन हेगडे (माणगाववाडी, ता. हातकणंगले) या संशयित शिकाऱ्यांचा समावेश आहे. ही कारवाई चंदगडचे वन क्षेत्रपाल तुषार गायकवाड, कानूरचे वनपाल चंद्रकांत पावसकर, वनपाल कृष्णा डेळेकर, वनपाल वर्षदा पावसकर, वनरक्षक सुरेखा चाळके, विकास राऊत, मौलामुबारक सनदी, आकाश मानवतकर, कृष्ण शेरे, राजू धनवई, वन सेवक कृष्णा पोवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.