

अनुराधा कदम
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच चित्रपट क्षेत्रात पुन्हा एकदा गटबाजी, राजकारण आणि आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. अनेक वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत कोल्हापूर आणि पुणे-मुंबई गटांमधील संघर्ष ठळकपणे समोर येत असून, निवडणूक प्रतिष्ठेची बनण्याची चिन्हे आहेत.
न्यायालयीन प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांनी प्रचारयंत्रणा सक्रिय केली आहे. विविध पॅनेलची आखणी, सभासदांशी संपर्क आणि गटबांधणीला वेग आला आहे. महामंडळाचे मुख्यालय कोल्हापुरात असले, तरी सभासद संख्येच्या जोरावर पुणे-मुंबई गट प्रभावी मानला जातो. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे.
मागील कार्यकारिणीच्या कामकाजावर काही सदस्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. आर्थिक गैरव्यवहार, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि काही सभासदांना डावलल्याचा आरोप विरोधी गटाकडून करण्यात येत आहे. तर, विद्यमान पदाधिकार्यांकडून हे आरोप निवडणूकपूर्व वातावरण तापवण्यासाठी केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अनेक सभासद मतदानापासून वंचित राहू नयेत, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पदाधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महामंडळातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मनमानी कारभाराचे आरोप
आर्थिक पारदर्शकतेचा प्रश्न
सभासद नोंदणीतील वाद
मतदान अधिकारावरून नाराजी
राजकीय हस्तक्षेपाची चर्चा
सुमारे 17 जागांसाठी निवडणूक
अंतिम मतदार यादीवरून आधीच वाद
नवीन पॅनेल उभारणीला वेग
कोल्हापुरातील सदस्य आक्रमक भूमिकेत